मुंबई - राज्यातील रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, राज्यातील अपघातांची संख्या काही केल्या कमी होत नाहीये. गेल्या दोन वर्षात राज्यात दुचाकी अपघातात 3 हजार 156 सहप्रवाशांना मृत्यूला झाले आहे. हा मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे झाल्याची माहिती समोर आली आहे.
दोन वर्षात तीन हजारपेक्षा जास्त मृत्यू -
गेल्या काही वर्षांत दुचाकीस्वारांचे अपघात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे हे अपघात कमी करण्यासाठी आणि वाहन चालकांना शिष्त लावण्यासाठी परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी अनेकदा हेल्मेट सक्ती केली होती. याशिवाय दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली. मात्र, तरी सुद्धा आज अनेक वाहन चालक वाहन चालवत असताना हेल्मेट परिधान करत नाही. यापूर्वी 'नो हेल्मेट,नो पेट्रोल” सारखे अभियान वाहतूक पोलिसांकडून चालविण्यात आले होते. विशेष म्हणजे हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांना परवाना रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे. तरी सुद्धा दुचाकी वाहनांचे अपघात कमी झाले नाही. २०१९ आणि २०२० मध्ये राज्यात झालेल्या दुचाकी अपघातांमध्ये हेल्मेट न घातल्याने तीन हजार १५६ सहप्रवाशांना मृत्यूला सामाेरे जावे लागले आहे.
अशी आहे आकडेवारी -
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी ते डिसेंबर २०१९ मध्ये दुचाकीवरील एक हजार ६४६ तर २०२० मध्ये एक हजार ५१० सहप्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत. यात मुंबई शहरात दोन वर्षात एकाही मृत्यूची नोंद नाही. तर ठाणे शहरात ३९, ठाणे ग्रामीणमध्ये ४५ आणि नवी मुंबई विभागात २४ सहप्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत चार हजार ५९१ जण गंभीर जखमी आणि एक हजार ८३४ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
राज्यात ३ हजार ५२० अपघात वाढले -
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत रस्ते अपघातांच्या संख्येत २० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जानेवारी ते जुलै २०२० या काळात राज्यात एकूण १३ हजार ४९ अपघात झाले होते. त्यात जानेवारी ते जुलै २०२१ या काळात १६ हजार ५६९ पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा ३ हजार ५२० अपघातांची संख्या वाढली आहे. तसेच या अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही यावर्षी वाढली आहे. राज्यात गेल्यावर्षी जानेवारी ते जुलै २०२० या काळात एकूण ५ हजार ९७० अपघाती मृत्यू झाले होते. त्यात यंदा ७ हजार ७८५ इकी वाढ झाली आहे.
मुंबईत अपघात वाढले-
मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांची संख्या ९१० वरून १ हजार १३४ पर्यंत वाढली आहे. मात्र अपघातांमध्ये मृत्यू पावण्याचे प्रमाण मुंबईत १६७ वरून १४९ पर्यंत घटले आहे. याशिवाय अपघातांमध्ये जखमी होण्याचे प्रमाणही ९०७ प्रवाशांवरून ९७९ पर्यंत वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त नाशिक ८५५, अहमदनगर ७९०, पुणे ७७४, कोल्हापूर ५८२, सोलापूर ५२१, नागपूर ५१७, जळगाव ४९२ आणि नांदेड ४६१ या जिल्हात सर्वाधिक अपघात झाले आहे.
हेही वाचा - नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मीय धार्मिकस्थळं होणार खुली; मुख्यमंत्र्यांचा निर्णय
हेही वाचा - रविवारी तिन्ही रेल्वे मार्गिकेवर मेगाब्लाॅक; प्रवाशांचे होणार हाल