मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या ( Number of measles cases ) झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत एकूण २२० रुग्णांची तर ३३७८ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. नालासोपारा येथील एका १ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ११ झाला आहे. ११ पैकी ९ मृत्यू मुंबईतील तर २ मृत्यू मुंबई बाहेरील आहे. २८ रुग्ण ऑक्सीजनवर, ५ रुग्ण आयसीयुमध्ये तर २ रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने ( Municipal Health Department ) दिली.
२८ रुग्ण ऑक्सिजनवर, २ व्हेंटिलेटवर : मुंबईत ३२ लाख ३३ हजार ०६८ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ३३७८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे २२० रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी कस्तुरबा, गोवंडी शिवाजी नगर प्रसूती गृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, राजावाडी, शताब्दी, सेव्हन हिल आदी रुग्णालयात ३१६ बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी ११४ बेडवर रुग्ण असून २०२ बेड रिक्त आहेत. १२५ जनरल बेडपैकी ७९, १५५ ऑक्सीजन बेड पैकी २८, १५ आयसीयु बेड पैकी ५ तर २१ व्हेंटिलेट पैकी २ व्हेंटिलेटरवर रुग्ण आहेत. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात १७ हजार ७०० मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत ९ तर बाहेरील २ मृत्यू : मुंबईमधील रुग्णालयात आतापर्यंत एकूण ११ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी ९ मृत्यू मुंबईतील तर २ मृत्यू मुंबईबाहेरील आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
१ वर्षाच्या मुलाचा मृत्यू : २२ नोव्हेंबरला नालासोपारा येथील १ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलाला १ महिन्यापासून ताप आणि खोकल्याचा त्रास होता. १२ नोव्हेंबरला त्याला पुरळ आले. त्याला गोवरची लस देण्यात आली नव्हती. १३ नोव्हेंबरला त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १४ नोव्हेंबरला त्याला निमोनिया झाल्याचे निदान झाल्याने सरकारी रुग्णालयात दाखल केले. १८ नोव्हेंबरला त्याची ऑक्सिजन पातळी कमी झाली. २१ नोव्हेंबरला त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. आज २२ नोव्हेंबरला त्याचा मृत्यू झाला.
लसीकरण आणि जनजागृतीवर भर : मुंबईत ० ते २ वयोगटातील पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले आहे. यात २० हजार मुलांचे लसीकरण राहिले आहे. काहींनी एकच डोस घेतला आहे. तर काहींनी लसिकरणच केलेले नाही. त्यामुळे अशा २० हजार मुलांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले जाणार असून या सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी लस घ्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. गोवंडी, चेंबूर, भायखळा, कुर्ला, मालाड, धारावी, सांताक्रूझ, वडाळा या ८ विभागात गोवरचे रुग्ण सर्वाधिक आहेत. यामुळे या विभागात जनजागृती केली जात आहे. धर्म गुरू, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत लसीकरणबाबत जनजागृती केली जात आहे. गरज पडल्यास बेड आयसीयु आणि व्हेंटिलेटरची संख्या वाढवली जाणार आहे.