मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांना पुरेसा निधी दिला जात नसल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर आल्या होत्या. त्यातच महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची एक बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांच्याकडेच आता निधी कमी मिळत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. तसेच, सत्तेत महत्त्वाच्या असलेल्या काँग्रेस पक्षाला दुजाभाव का दिला जातोय? असा देखील प्रश्न काँग्रेस मंत्र्यांनी बैठकीत उपस्थित केला.
वीज बिलाबाबात लवकर तोडगा काढा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीत काँग्रेस नेत्यांना निधी कमी दिला जात असल्याची खंत बोलून दाखवली आहे. तसेच, अजूनही सामान्य लोकांच्या वीज बिलाचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारकडून सोडवला गेला नाही. त्या प्रश्नावरही लवकरात लवकर तोडगा काढला गेला पाहिजे, असे नाना पटोले यांनी काँग्रेसच्या बैठकीत सांगितले.
नाना पटोलेंचा आघाडी सरकारला घरचा आहेर
येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्या निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस मंत्री तसेच नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेस मंत्र्यांना मिळणाऱ्या निधी बाबतच्या तक्रारी करण्यात आल्या. यावेळी नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला दुजाभाव मिळत असल्याचे सांगत महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला.
मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणात शासनाने लक्ष घालावे
तसेच दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात राज्य शासनाने लक्ष घालावे. या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करावा. सचिन वाझे प्रकरणात देखील लवकरात लवकर स्पष्टता येईल यासाठी राज्य सरकारने काम करावे. यावर देखील बैठकी चर्चा झाली. तसेच, या बैठकीत चर्चा झालेले मुद्दे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवले जातील, अशा प्रकारचे संकेतही नाना पटोलेंनी दिले.
हेही वाचा - बंदीचा आदेश झुगारुन बावधन येथे बगाड यात्रा, शंभरहून अधिक जणांना अटक
हेही वाचा - कर्मचाऱ्यांची नजर चुकवून कोरोना रूग्ण पळाला, पुढे काय घडलं, वाचा...