मुंबई - एखाद्या प्रकल्पाला विरोध म्हणजे विकासाला विरोध नाही, असे नाणार प्रकल्पाचे नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत होते. तसेच कोकणच्या व्यक्तिमत्वाला धक्का न लागता कोकणाचा विकास साधायचा आहे, असेही ते म्हणाले.
कोकणच्या विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत. पर्यटन हा कोकणच्या विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. याबाबत पुढील काळात अनेक बदल करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, सिंधुरत्न योजना सुरू करण्यात येणार आहे. यात रस्ते, पिण्याचे पाणी, काजू-आंबे या फळांवर प्रक्रिया प्रकल्प मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मासेमारीचाही प्रश्न आहे. अनेकदा कोकणात मासेमारीचा दुष्काळ असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रश्नाला काही अंशी जबाबदार असलेली आयईडी लाईटिंग मासेमारी बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, यासंदर्भात केंद्र सरकारने कायदा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर मच्छीमारांना डिझेल परताव्याचे पैसे देण्यास सुरुवात केली आहे. समुद्री मार्गाचे काम जलदगतीने सुरू आहे. काही ठिकाणी काँक्रीटीकरण झाले आहे तर काही ठिकाणी काम सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
हेही वाचा - 'सगळं करून नामानिराळं कसं राहावं.....' रामराजेंचा फडणवीसांना टोला
येत्या 1 मे रोजी चिपी विमानतळाचे उद्घाटन -
कोकणच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन येत्या 1 मे रोजी करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच पर्यटकांसाठी सुविधा कशा वाढवता येईल? याचा विचारही शासन करत आहे. पर्यटनाच्या पाणबुडीद्वारे सागरी तळाचे सौंदर्य दाखविणारा उपक्रम सुरू करण्याचा विचार शासन करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.