मुंबई - काँग्रेसच्या पक्षनेतृत्व संदर्भात तातडीने निर्णय घेण्याची मागणी करत ज्या काँग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले हे पत्र मोठे षड्यंत्र आहे. राहुल गांधी अध्यक्ष असतानासुद्धा ते अडचणीत सापडतील आणि अपयशी ठरतील, असेच काम काही लोकांनी केले होते, असा खळबळजनक आरोप करत या देशाला सध्या राहुल गांधी यांची गरज असून ते अध्यक्ष झाले तरच काँग्रेस वाचेल, अशा शब्दात काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी 'ईटीव्ही भारत' शी आपली प्रतिक्रिया बोलताना दिली.
दिल्लीत काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक सुरू असून त्या बैठकीत राहुल गांधी यांच्याच नावाचा विचार व्हावा, अशी आपली भूमिका असल्याचे ते म्हणाले
काँग्रेसच्या 23 नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्ष नेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी केली होती. यासंदर्भात आता दिल्लीत बैठक सुरू आहे. काँग्रेसमधील बहुतांश नेत्यांची राहुल गांधी हेच अध्यक्ष व्हावेत, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात निर्णय होणार आहे. मात्र, राहुल गांधी अध्यक्ष झाले नाहीत तर काँग्रेसला कोणी वाली उरणार नाही आणि राहुल गांधी विरोधात षडयंत्र करणारे लोक काँग्रेसला संपवतील, असा आरोपही निरुपम यांनी केला.
हेही वाचा - LIVE: काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत घमासान; आझादांनी दाखवली राजीनाम्याची तयारी
राहुल गांधीच्या विरोधात या लोकांनी कायमस्वरूपी षड्यंत्र रचण्यात आले आहेत. त्यामुळे हे पत्र राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला शह देण्यासाठी एक प्रकारे एक कॅम्पेन असल्याचेही ते म्हणाले. ज्या लोकांनी पत्र लिहिले त्यांनी सोनिया गांधी यांना भेटून जर राहुल गांधी यांना अध्यक्ष करावे, अशी मागणी केली असती तर त्याला यश मिळाले असते. परंतु त्यांनी तसा प्रकार केला नाही. मी सुरुवातीपासूनच म्हणतोय की देशाला राहुल गांधी यांची गरज आहे. तेच भक्कमपणे देशातील भाजपसारख्या पक्षाचा मुकाबला करू शकतील. त्यामुळे तेच अध्यक्ष झाले पाहिजेत. त्यांच्याशिवाय इतर कोणीही अध्यक्ष बनू नये, अशी आपली भूमिका असल्याचे निरुपम म्हणाले.
हेही वाचा - काँग्रेसमधील पक्ष नेतृत्वाच्या संघर्षाचा इतिहास, 'या'वेळी झाले होते वाद