मुंबई - एकीकडे वंचित बहुजन आघाडीच्या मताधिक्याने ९ ते १० काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे राज्यात वंचित आघाडीचा दबदबा निर्माण झाला आहे. या बहुजन आघाडीचा वंचित घटकाला फायदा झाला नसून केवळ एमआयएमलाच या निवडणुकीत लाभ झाला असल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, राज्यात वंचित आघाडीने सर्वत्र उमेदवार उभे केले. पण त्यांना कुठेही विजय मिळवता आला नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनाही पराभव स्वीकारावा लागला. एमआयएमचे इम्तियाज जलिल यांना वंचित आघाडीचे सांगण्यात आले असले तरी ते एमआयएमचेच उमेदवार होते. त्यामुळे वंचितचा खासदार निवडून आला असे म्हणता येणार नाही.
जे लोक उजळ माथ्याने 'हम निजाम है' असे म्हणतात त्यांचा विजय झाला. तर ज्यांनी आयुष्यभर निजाम काळातल्या रझाकरांशी संघर्ष केला त्यांचा हा अवमान झाल्यासारखे आहे, असेही गोऱ्हे म्हणाल्या.