मुंबई: राज्यातील जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने शिधापत्रिकाधारक जनतेला दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा (Aanadacha Shidha) थेट पाठवण्याचा निर्णय घेतला होता. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्यानंतर हा निर्णय घेतला होता. मात्र त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करणे प्रशासनासाठी अवघड जात आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट अन्नपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांना दूरध्वनीवरून सूचना देत निर्णयाची ताबडतोब अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते, मात्र वेळेअभावी हा शिधा दिवाळीपर्यंत सर्व जनतेपर्यंत पोहोचू शकला नाही. (50 percent people got Aanadacha Shidha). दिवाळीच्या काळात तीन दिवस सुट्ट्या असल्याने वाटप झाले नसल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांनी दिली.
50 टक्के जनतेपर्यंतच शिधा: राज्यात एक कोटी सत्तर लाख शिधापत्रिकाधारक आहेत. या सर्व शिधापत्रिकाधारकांपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचवण्याचे प्रयत्न राज्य सरकारच्यावतीने सुरू आहेत. वार्षिक पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी अंत्योदय योजना तर ग्रामीण भागात वार्षिक 44000 आणि शहरी भागात वार्षिक 59 हजार रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी स्वस्त धान्य योजना सरकारच्या वतीने राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अन्नधान्य पोहोचवण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही वितरण प्रणाली वेळ घेणारी असल्याने रेशन दुकानांमध्ये असलेल्या पॉश या ऑनलाइन योजनेअंतर्गत हे धान्य वाटप न करता आनंदाचा शिधा ऑफलाईन वाटण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आतापर्यंत केवळ 50 टक्के जनतेपर्यंतच हा शिधा पोहोचला असून, अजूनही 80 ते 85 लाख लोक या आनंदाच्या शिधापासून वंचित आहेत.
तिप्पट कमी किमत: राज्य सरकारचा जीवनावश्यक वस्तू दर नियंत्रण कक्ष हा राज्यातील विविध 15 ठिकाणाहून जीवनावश्यक वस्तूचे खुल्या बाजारातील दर तपासून घेत असतो. त्यानुसार खुल्या बाजारातील वस्तूंच्या किमतीच्या तुलनेत तिप्पट कमी दरात आनंदाचा शिधा राज्य सरकार तर्फे उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा वाघमारे यांनी केला आहे. 300 रूपये किंमतीच्या चनाडाळ, रवा, साखर आणि पामतेल या चार वस्तू शंभर रुपयांत देण्यात आल्या आहेत. खुल्या बाजारा इतक्या किमतीतच आनंदाचा शिधा उपलब्ध केल्याचा आरोपात काही ताकद नाही असेही ते म्हणाले.
सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघात : राज्यभरात आनंदाचा शिधा वितरित होत असला तरी आतापर्यंत आनंदाचा शिधा जिथे वितरित झाला आहे ते मतदारसंघ सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटांच्या आमदारांचे मतदार संघ आहेत. विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदार संघात अद्यापही दिवाळी झाली तरी आनंदाचा शिधा पोहोचलेला नाही. त्यामुळे ही दिवाळी केवळ सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघापूर्तीच मर्यादित आहे का? असा सवाल काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.