मुंबई - पवईत किरकोळ कारणामुळे एका तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला आहे. खुनाची ही घटना मंगळवारी (दि. 18 फेब्रुवारी) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अमोल सुराडकर (वय 25 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी सचिन सिंग आणि जितेंद्र उर्फ प्राण या दोघांना अटक केली आहे.
पवईतील गोखले नगर परिसरातील साधना हॉटेल या ठिकाणी मृत अमोल सुराडकर मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास बसला होता. त्यावेळी आरोपी जितेंद्र त्या ठिकाणी आला आणि अमोल सोबत परिसरात हातगाडी लावण्यावरून वाद घालू लागला. यावेळी लागलीच जितेंद्रने आपला साथीदार सचिन सिंग यास फोन करून बोलावून घेतले. अमोल सोबत दोघांनी मिळून हातगाडी लावण्याच्या रागात जितेंद्र यास मारहाण केली. दरम्यान, सचिनने अमोलच्या छातीत चाकू खुपसला आणि दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला.
जखमी अमोल यास पोलिसांनी प्रथम पवई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, अतिरक्तस्त्राव झाल्याने पुढील उपचारासाठी त्यास हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. पवई पोलिसांनी जितेंद्र यास पवई परिसरातून तर सचिन याला लोकमान्य टिळक टर्मिनसवरून ताब्यात घेत अटक केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा - ओएलएक्सवर जाहिरात देऊन लूटणारे दोघे जेरबंद