मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भावीक येत असतात. साईंच्या दर्शनासाठी भाविकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते. यावेळी अनेक अडचणी आणि उकाड्याचा त्रास भाविकांना होतो. या भाविकांचे दर्शन अधिक सहज आणि आरामदायी व्हावे यासाठी आता श्री साई शिर्डी संस्थान वातानुकूलित दर्शन मार्ग संकुल निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. ( air conditioned Darshan Marg )
कसे असेल दर्शन संकुल? शिर्डी येथील साई मंदिर परिसरात सुमारे दोन लाख सात हजार चौरस फुटाचे साई दर्शन कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहे. तळमजला अधिक दोन मजले अशीही दर्शन इमारत असणार आहे.या दर्शन मार्गाच्या संकुलात बारा भव्य कक्ष उभारण्यात येणार असून हे कक्ष वातानुकूलित असणार आहेत. (air conditioned Darshan Marg) दिव्यांग आणि वृद्ध व्यक्तींसाठी उद्वाहन आणि रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे. दर्शन संकुलात सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येणार असून सुमारे दोनशे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे. दर्शन संकुलात शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात येणार आहे. या सर्व संकुल उभारणासाठी १०९ कोटी ५० लाख रूपये खर्च येणार आहे. अशा प्रकारची सुविधा आता केवळ तिरुपती बालाजी मंदिरात उपलब्ध आहे त्याच धर्तीवर साई मंदिरातही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती शिर्डी संस्थान प्रशासनाचे उपकार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. ( air conditioned Darshan Marg is being constructed )
शिर्डी विमानतळावर रात्रीही उतरणार विमाने : शिर्डी विमानतळावर आता नवीन टर्मिनल इमारत तयार करण्यात येत आहे. त्यामुळे या विमानतळावर आता रात्रीही विमानांचे आवाज ऐकू येऊ शकते रात्री विमाने उतरण्याची सोय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री आणि त्यांचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 2017 मध्ये शिर्डी विमानतळ सुरू करण्यात आल्यानंतर या विमानतळाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विमानतळाचे लोकार्पण केले होते. सध्या शिर्डीत दिवसभरात 22 विमानांची येजा सुरू असते. एप्रिल 2019 ते मार्च 2022 या दरम्यान न सुमारे एक लाख 76 हजार 787 प्रवाशांनी शिर्डी विमानतळावरून प्रवास केला. मात्र सध्या येथे रात्री विमाने उतरण्याची सोय नाही ती सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ( constructed in Shirdi)
2024 मध्ये तयार होणार नवीन टर्मिनल इमारत : मे 2024 मध्ये शिर्डी विमानतळाच्या इमारतीचे काम पूर्ण होणार आहे. एप्रिल 2023 पासून या कामाला सुरुवात होणार असून सुमारे एक वर्षानंतर ते पूर्ण होणार आहे. विमानतळ व्यवस्थापन करणारे एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात सांगितले की, या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत त्यांनी सर्व कामांना तात्काळ गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. नव्या टर्मिनल च्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती ही त्यांनी दिली. या संदर्भात लवकरच निविदा जारी करण्यात येतील अशी माहिती एएमडीसी ने दिली आहे. एप्रिल 2023 पासून या टर्मिनलच्या निर्मितीला सुरुवात होण्याची शक्यता असून एकदा कामाला सुरुवात झाल्यानंतर या कामासाठी 18 महिने लागण्याची शक्यता या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.