मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याने भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यादरम्यान, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण करणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. या कर्मचाऱ्याचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला आहे.
मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रोज कुठे ना कुठे नवा रुग्ण आढळून येत आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जसलोक हॉस्पिटलमधील एका नर्सला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर वरळी येथे राहणारा आणि धारावीत सफाईचे काम करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर बेस्टच्या वडाळा बसस्थानकात फोरमनचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याला सुरुवातीला एसआरवी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याला कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती होती. तर उपचारादरम्यान या बेस्ट कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - केंद्राने जीएसटीचे १६ हजार कोटींचे देणे राज्याला द्यावे - बाळासाहेब थोरात
या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने तो राहत असलेल्या टिळकनगर येथील इमारतीमधील रहिवाशांना तसेच तो काम करत असलेल्या बेस्टच्या स्थानकामधील कर्मचाऱ्यांनाही 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. या कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.