मुंबई - रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून ९ जणांना लुबाडणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या युनिट ३ ने अटक केली आहे. संतोष भिसे असे या आरोपीचे नाव आहे.
आरोपी भिसे हा गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागातून मुंबईत दाखल झालेल्या युवकांना गाठायचा. आपण रेल्वेत नोकरी करत असून रेल्वे बोर्डात माझी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ओळख आहे. त्यामुळे नोकरी हवी असल्यास काही लाखात मी सहज नोकरी मिळवून देऊ शकतो, असे सांगून तो पीडित युवकांकडून पैसे घेत होता. बऱ्याच मुलांना नोकरी मिळवून दिली असून याचा पुरावा देण्यासाठी आरोपी संतोषने www.rrccbgon.in ही बनावट वेबसाईट बनवली होती. या वेबसाईटवर त्याने बनावट उमेदवार आणि त्यांची सध्याची पोस्टिंग कुठे करण्यात आली आहे. या बद्दल माहिती सुद्धा टाकली होती. या गोष्टीला बळी पडलेल्या युवकांना आरोपी संतोष भिसे हा पुण्यात नेऊन त्यांचे मेडिकल सर्टिफिकेट बनवून घेत होता.
अशाच एका प्रकरणात पीडित तक्रारदार संतोष आडे या युवकाकडून लाखो रुपये घेतले होते. संतोषने त्याच्याकडे नोकरीचा तगादा लावला. यामुळे आरोपीने काही महिने टाळाटाळ केल्यानंतर तुझी रेल्वेत नेमणूक झाली असल्याचे सांगितले. पण ही पोस्टिंग कोलकाता येथे झाली आहे. ही पोस्टिंग नको असल्यास पुन्हा काही लाख रुपये द्यावे लागतील, असे आरोपीने सांगितल्यावर संतोषचा संशय बळावला आणि त्याने पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी भिसेला अटक केली. आता पर्यंत या आरोपीने ९ जणांना फसवल्याचे पोलीस तपासत समोर आले आहे.