मुंबई - डोहाळे जेवण आणि भारताचा स्वातंत्र्य दिन असा अनोखा योग साधत जे. जे. रुग्णालयातील एका परिचारिकेने चक्क 70 किलो शिऱ्याचे वाटप केले आहे. यानिमित्ताने रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांना या शिऱ्याचा आस्वाद घेता आला. ज्या परिचारिकेने हा अल्पोपहार दिला, तिने आपले नाव गुप्त ठेवले आहे.
७ महिन्याची गर्भवती परिचारिका जे जे. रुग्णालयात काम करते. सातव्या महिन्यात डोहाळ जेवण घालण्याची प्रथा आहे. परंतु रुग्णालयात सेवा करत असताना हा सोहळा अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा विचार तिच्या मनात आला आणि ७० किलोचा अननसाच्या चवीचा शिरा बनवण्याचे ठरवले. यासाठी लागणारे सर्व साहित्य तिने रुग्णालयातील स्वयंपाक विभागात आणून दिले. त्यानंतर हा शिरा कर्मचारी आणि रुग्णांना वाटण्यात आला.
रुग्णालयात वेगवेगळे प्रकारचे अभिनव उपक्रम सतत पाहायला मिळतात. काही जण वाढदिवसानिमित्त उकडलेली अंडी, फळांचे वाटप, कधी शिरा तर कधी खीर किंवा शीरखुर्मा रुग्णालयात वाटत असतात. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन आमच्या या परिचारिकेने हा निर्णय घेतला, जो खरोखर अतिशय कौतुकास्पद असल्याची भावना रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी व्यक्त केली.