मुंबई - मागील अनेक वर्षांपासून परीक्षा आणि त्यातील गोंधळासाठी मुंबई विद्यापीठ प्रसिद्ध आहे. तर आता पुन्हा एकदा या विद्यापीठाने विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका देण्याचा प्रताप केला आहे. दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल)च्या घेण्यात येत असलेल्या टी.वाय. बीकॉम परीक्षेत हा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे.
नुकताच मुंबई विद्यापीठाने टी.वाय. बीकॉमच्या नियमित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला असून सध्या विद्यापीठाच्या आयडॉलच्या टीवाय बीकॉमची परीक्षा सुरू आहेत. सोमवारी टीवायचा टॅक्स विषयाचा पेपर होता. परंतु नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाचा पेपर देण्यात आल्याने परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला. विद्यार्थांनी परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका बदलून देण्याची मागणी केली. मात्र, प्रश्नपत्रिका बदलून देण्यास नकार देण्यात आला. काही महाविद्यालयांनी याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे तक्रार नोंदवली आहे.
मुंबई विद्यापीठामार्फत सध्या सुरू असलेल्या परीक्षांमध्ये नवीन आणि जुन्या अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यात येत आहे. नवीन अभ्यासक्रमाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाचा पेपर देण्यात आल्याची तक्रार महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे केली आहे. याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल आणि यात कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया विद्यापिठाचे उपकुलसचिव विनोद माळाळे यांनी दिली.