मुंबई- गणेशोत्सव दरम्यान भाविकांची संख्या पाहता मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ड्ट रुग्णालयाने पुढाकार घेत मुंबईतील ५० हून अधिक गणेश मंडळांतील २५० स्वयंसेवकांना कार्डिओ पल्मनरी रेसुसिटेशन (सीपीआर) आणि बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) यांचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे गणेशोत्सव दरम्यान वैद्यकीय आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यात मंडळांना मदत होणार आहे.
मुंबईत मोठ्या उत्सवात साजरा होणारा गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावेळी गणेशोत्सवाचे देखावे बघण्यासाठी अनेक ठिकाणी लोक फिरत असतात. अशा वेळेस वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे या समस्यांचा सामना करण्यासाठी मुंबई सेंट्रलचे वोक्हार्ड्ट रुग्णालय गणेश मंडळांच्या मदतीला सरसावले आहे. रुग्णालयातर्फे स्वयंसेवकांना सीपीआर व बीएलएस तंत्रांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. एखाद्या व्यक्तीला कार्डिअॅक अरेस्ट (हृदयक्रिया बंद पडणे) झाल्यास ही तंत्रे उपयुक्त ठरतात. त्यामुळे धामधुमीच्या काळात कोणाला कार्डिअॅक अरेस्ट झाल्यास मंडळांना सदरील उपाय वापरुन त्या व्यक्तीचे प्राण वाचवता येणार आहे.
या १० दिवसात प्रचंड धांदल असते, त्यामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढते. अशा प्रकारच्या वैद्यकीय आणीबाणी हाताळण्यात गणेश मंडळांना मदत करण्यासाठी वोक्हार्ड्ट रुग्णालय मुंबईतील ५०हून अधिक गणेश मंडळांतील २५० स्वयंसेवकांना कार्डिओपल्मनरी रेसुसिटेशन (सीपीआर) आणि बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) यांचे प्रशिक्षण दिले असल्याचे मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ड्ट रुग्णालयाच्या प्रमुखांनी सांगितले.
दरवर्षी लाखो भक्त त्यांच्या लाडक्या बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी आमच्या मंडळाला भेट देतात. काही वेळा येथे येणाऱ्यांपैकी कोणाला तरी वैद्यकीय मदतीची गरज निर्माण होते आणि परिस्थिती कठीण होऊन जाते. त्यामुळे मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ड्ट रुग्णालयाने हाती घेतलेला उपक्रम अशा प्रसंगांमध्ये खूपच उपयुक्त ठरू शकतो, असे मंडळाचे स्वप्निल परब यांनी सांगितले.