मुंबई - लांबलेल्या पावसामुळे अजूनही हवी तशी थंडी पडायला सुरुवात झाली नाही. मुंबईच्या तापमानात घट झाली असली तरी स्वेटर घालण्याइतकी थंडीची चाहूल नाही. अशा परिस्थितीत स्वेटर, चादरी आणि उबदार जॅकेट खरेदी करण्यासाठी गिऱ्हाईकच नसल्याने थंडीच्या महिन्यातही स्वेटर विक्रेत्यांचा व्यवसाय थंडच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
थंडी म्हटलं की, साधारण सप्टेंबर महिन्याअखेरीस पाऊस ओसरला की दिवाळीपासून गुलाबी थंडी पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे दिवाळीपासून अनेक विक्रेते आपला माल विकण्यास सुरुवात करतात. बाहेर राज्यातीलही अनेक विक्रेते हिवाळ्याआधीच राज्यात येवून स्वेटर विक्रीची दुकाने थाटतात. स्वेटर, उबदार चादरी, ब्लँकेट्स मिळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या परेलच्या मार्केटमध्ये बरेच ग्राहक दूरवरून खरेदीसाठी येत असतात. मात्र, यावर्षी त्या प्रमाणात ग्राहक आलेले नसल्याने विक्री कमी प्रमाणात होत असल्याची प्रतिक्रिया दुकानदारांनी दिली.
हेही वाचा - एसटीची विना वातानुकूलित शयन-आसन बस प्रवाशांच्या सेवेत
नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी अधून मधून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे दिवाळी संपूनही थंडीचा पत्ता नाही. त्यामुळे लोकांमध्येही स्वेटर, उबदार जॅकेट, चादरी, ब्लँकेट घेण्याची लगबग अद्याप सुरू झालेली दिसून येत नाही. दरवर्षी या दिवसात मखमली उबदार चादरी, ब्लँकेट्सना प्रचंड मागणी असल्याने हा माल जास्त प्रमाणात खपतो. मात्र, यंदा पावसामुळे चादरी व ब्लँकेट्स खरेदीवर विपरीत परिणाम जाणवला असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
हेही वाचा - अहमदनगर, पुणे, औरंगाबादसह 8 जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या संवर्गासाठी
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अपेक्षेप्रमाणे धंदा झाला नसला तरी अजूनही थंडीचे काही महीने बाकी आहेत. त्यामुळे या महिन्यात आम्ही नुकसान भरून काढू, असे काही स्वेटर विक्रेत्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
हेही वाचा - नवीन वर्षात पुणे - मुंबई रेल्वे वाहतूक होणार सुरक्षीत