मुंबई - आर्थिक राजधानीतील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून मुंबई मेट्रो १ ने अत्यंत वाजवी दरात भाड्याने सायकल देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी जागृती नगर मेट्रो स्थानकातून सुरू झालेल्या 'मायबाईक' या सुविधेला प्रवाशांनी थंड प्रतिसाद दिला.
जागृती नगर मेट्रो स्थानकात 'मायबाईक' सायकल स्टँडचे एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. २ रुपये प्रति तास या दरात ही सायकल सेवा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. या स्टँडवर ५० सायकल ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील दोन ते तीनच सायकल भाड्याने गेल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा - दिल्ली गोळीबार; पोलीस कॉन्स्टेबलसह चौघांचा मृत्यू, तर डिसीपी गंभीर
अशी मिळणार सायकल
सर्वप्रथम प्रवाशांना 'मायबाइक' हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागेल. यानंतर त्यात प्रोफाइल तयार करून ५०० रुपयांच्या ठेवीची रक्कम जमा करावी लागेल. या अॅपद्वारे लॉक सायकल भाड्याने घेता येणार आहे. या सायकल तुम्ही घरी किंवा कार्यालयातही ठेऊ शकता. घाटकोपर ते वर्सोवादरम्यान दररोज मेट्रो वनने सुमारे २ लाख नागरिक प्रवास करतात. त्यांना या सुविधेचा फायदा घेता येणार आहे.