मुंबई : कांदिवलीतील कामगार रुग्णालयाजवळील खासगी मशिदीवरील भोंग्यामुळे एका डीसीपीला मुंबई उच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले आहेत. कांदिवलीमध्ये वकील असलेल्या रिना रिचर्ड यांनी मशिदीवरील बेकायदेशीर लाऊड स्पीकर बंद करण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने भोंग्यावर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. परंतु कारवाई केली नसल्याने न्यायालयाने डीसीपी यांना झापले. कारवाई का केली नाही या प्रतिज्ञापत्रासह 19 जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच "उच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करत नाही. म्हणजेच तुम्ही न्यायालयाचा अवमान करीत आहात" असे देखील न्यायालयाने निर्देशात अधोरेखित केले.
रुग्णालयाजवळ आहे मशीद : उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अभय आहुजा आणि न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. दरम्यान कांदिवली येथील कामगार रुग्णालयाच्या 90 मीटर अंतरावर गौसिया मस्जिद आहे. या मशिदीवर भोंगा लावण्यात आला असून तो अधिक कर्कश आवाजात चालवला जातो. या भोंग्यामुळे नागरीक आणि रुग्णांना त्रास होतो. यामुळे वकील रिना रिचर्ड आणि येथील स्थानिक नागरिकांनी उच्च न्यायालयात कारवाई करण्याची याचिका दाखल केली होती.
न्यायालयाचा संताप : "याआधी देखील मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ओक यांच्या खंडपीठाने सक्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर काही काळ हा भोंगा बंद राहिला. पण आता पुन्हा मोठ्या आवाजामध्ये हा भोंगा वाजत असल्यामुळे याच्यावर ताबडतोब कारवाई करावी,"अशी मागणी याचिकेमध्ये वकील रीना रिचर्ड यांनी केली होती. याबाबत मागच्या सुनावणीमध्ये दिलेल्या निकालाचे पालन केली नसल्याची बाब वकील रीना रिचर्ड यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे न्यायालयाने संताप व्यक्त केला.
याचिकेद्वारे न्यायालयासमोर उघड केली ही बाब : "सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या निकालानुसार रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊस्पीकर लावण्यासाठी मनाई केलेली आहे. खासगी असो किंवा सार्वजनिक कोणत्याही ठिकाणी लाऊडस्पीकरचा आवाज हा आपल्या कंपाऊंडच्या बाहेर म्हणजे आपल्या घराच्या बाहेर जायलाच नको. हे देखील सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या आदेशात नमूद असल्याचे" वकील रीना यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने कारवाई करण्याचे मागे आदेश दिल्यानंतरही कारवाई झाली नाही हे देखील न्यायालयाच्यासमोर सांगण्यात आले. याचबरोबर "जिथे रुग्णालय आहे ते रुग्णालय शांतता क्षेत्रात येते. तरीसुद्धा अशा ठिकाणी मोठ्या आवाजात मस्जिदवरील भोंगा रोज वाजत राहतो. ज्याच्यामुळे रुग्णांना आणि इतर जनतेला त्रास होत असतो. यामुळे हे ताबडतोब थांबले पाहिजे. यासाठी पोलिसांना न्यायालयाने सक्तीचे कारवाई करण्याचे आदेश द्यावे "अशी मागणी देखील याचिकेमध्ये वकील रीना रिचार्ज यांनी केली.
डीसीपीला झापले : पोलिसांची बाजू तसेच याचिकाकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मुंबई पोलीस परिमंडळ 12चे डीसीपी यांना झापले. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी काय कारवाई केली याचीही विचारणा न्यायालयाने केली " आधी निर्देश असतानाही याबाबत तुम्ही कारवाई केली नाही. म्हणजेच उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे अवमानन केले, असे आता आम्ही समजतो. आता तुम्ही 19 जून रोजी लेखी प्रतिज्ञापत्र सादर करावे" असे देखील निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.
हेही वाचा -