मुंबई : मुंबईच्या नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी या शैक्षणिक संस्थेने बीकॉम द्वितीय वर्षात शिकणाऱ्या तब्बल 180 विद्यार्थ्यांचे निलंबन केल्याची घटना समोर आली आहे. हे इन्स्टिट्यूट मुंबईच्या विलेपार्ले येथे असून, या 180 विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे संस्थेच्या प्रशासनाने म्हटले आहे. निलंबन केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये बीकॉम द्वितीय वर्ष अ, ब, क, अशा तीनही शाखांच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना 24 मार्च रोजी या संदर्भातील नोटीस देखील बजावण्यात आली होती.
निलंबनाची कारवाई: याप्रकरणी नरसी मोनजी इन्स्टिट्यूटच्या प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट करताना म्हटले आहे की, निलंबनाची कारवाई केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सतत गैरहजर रहाणे, शैक्षणिक प्रक्रियेत अडथळा करणे, गैरवार्तावन करणे या याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. या विद्यार्थ्यांसदर्भात त्यांच्या प्राध्यापकांच्या तक्रारी देखील आमच्याकडे अनेकदा आल्या आहेत. एका प्राध्यापकांनी एका विद्यार्थ्याला वर्गाबाहेर जाण्यास सांगितले होते. पण, तो विद्यार्थी पुन्हा आत आला आणि त्याने प्राध्यापकांशी वाद घालण्यास सुरुवात केली.
असे केले गैरवर्तन: वर्गामध्ये प्राध्यापक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे मुलांना शिकवत होते. त्याच वेळी एका विद्यार्थ्याने त्याचे डिव्हाईस ई बोर्डला जोडले, त्यावर गाणी वाजवायला सुरुवात केली. बीकॉमच्या कारवाई करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांबाबतीत या गोष्टी रोज घडत होत्या.
निलंबनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान: कारवाई करण्यात आलेल्या बीकॉम द्वितीय वर्ष अ ब आणि क तुकडीच्या काही विद्यार्थ्यांच म्हणणे आहे की, असे गैरवर्तन करणारे जे कोणी आहेत फक्त त्यांच्यावर संस्था प्रशासनाने कारवाई करायला हवी होती. जे विद्यार्थी चुका करतात त्याची शिक्षा संपूर्ण वर्गाला का दिली ? महाविद्यालय प्रशासनाच्या या निर्णयामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागत आहे. यावर महाविद्यालय प्रशासनाने म्हटले आहे की, कोणतीही संस्था कोणतही महाविद्यालय आपल्या विद्यार्थ्यांचे वाईट चिंतत नाही. आम्ही देखील आमच्या विद्यार्थ्यांचे वाईट चिंतत नाही. आम्ही ही गोष्ट मान्य करतो की या निलंबनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शिस्त लागावी म्हणून आम्हाला हे कठोर पाऊल उचलणे गरजेचे होते, असे महाविद्यालय प्रशासनाने म्हटले आहे.