मुंबई - भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. 'शहरातली सर्वात एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून मला मानहानीची नोटीस येणार का? वकील साहेबांची तर लागली आहे. आता वस्त्रहरण अटळ आहे'. अशा आशयाचं ट्वीट करत भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला होता. निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी अनिल परब यांच्यावर एका पत्राच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत. त्या पार्श्वभूमिवर त्यांनी हे ट्वीट केले आहे.
नितेश राणेंचे काय होते ट्विट?
'मी विचार करत होतो. मला शहरातली सर्वात एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून अजूनही मानहानीची नोटीस येणार का? नोटीसची आतुरतेने वाट पाहत आहे. वकील साहेबांची तर काल लागली. आता नोटीस कोण बनवणार?' असा उपरोधिक सवाल नितेश राणे यांनी ट्विटरवरुन विचारला आहे.
![नितेश राणेंच ट्विट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11325652_248_11325652_1617868656620.png)
नितेश राणेंनी कालही ट्विटरवरुन निशाणा साधला होता.
'ओ परिवार मंत्री.. शपथ काय घेता.. शेंबूड पुसा.. राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा.. पुरावे तयार आहेत.. आता वस्त्रहरण अटळ आहे!!' असे ट्वीट नितेश राणेंनी काल ( बुधवारी ) केले होते.
सचिन वाझेच्या पत्रात नेमकं काय?
निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात एक पत्र देऊन परब यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. 'अनिल परब यांनी आपल्याला जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये बोलावून घेतलं होतं. यावेळी त्यांनी सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी) कडून ५० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. या एसबीयूटीची चौकशी सुरू होती. आधी त्यांनी मला या एसबीयूटी प्रकरणाची चौकशी करून ट्रस्टींसोबत चर्चा करायला सांगितलं होतं. नंतर केस बंद करण्याच्या नावाखाली एसबीयूटीकडून ५० लाख रुपये वसूल करण्यास सांगितले. त्याला मी नकार दिला. कारण एसबीयूटीमध्ये मी कुणालाच ओळखत नव्हतो. तसेच चौकशीशी माझा काही संबंधही नव्हता' असं वाझेंनी या पत्रात म्हटलं आहे.
हेही वाचा - दिव्याखाली अंधार, फेब्रुवारी महिन्यात पोलिस आयुक्तालयात आलेल्या वाहनांची नोंदच नाही
हेही वाचा - मास्क नव्हे तर भारतीय संस्कृतीच खरे 'कोरोना कवच'; उशा ठाकूर यांचे दिव्यज्ञान!