मुंबई: बेस्टवर असलेले कर्ज कमी करण्यासाठी पालिकेने पाच हजार कोटीहून अधिक निधी मदत म्हणून दिला आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी भाडे कपात करून प्रवासी संख्या वाढवण्याचा तसेच खासगी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा सल्ला पालिकेने दिला होता. यानुसार बेस्टने एसी, इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. कमीतकमी प्रवासी भाडे ५ रुपये केले आहे. याचा फायदा बेस्टला झाला असून बेस्टमधून सध्या सुमारे ३४ लाख प्रवासी प्रवास करत आहेत.
तीन नवीन प्लान: बेस्टने मागील वर्षी स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव, नवरात्री आदी सणांच्या वेळी 'सुपर सेव्हर प्लान' घोषित केले होते. या प्लानला मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी प्रतिसाद दिला होता. आता प्रवासी संख्या आणखी वाढवण्यासाठी बेस्टने १ ते ४ आठवड्यांसाठी, दैनिक आणि फ्लेक्सिबल असे प्लान घोषित केले आहेत. या प्लानमध्ये कमी रक्कम खर्च करून जास्त प्रवास करण्याची मुभा प्रवाशांना मिळणार आहे. त्यामुळे प्रवासी संख्या आणखी वाढेल अशी माहिती बेस्ट अधिकाऱ्यांनी दिली.
असा होणार प्रवाशांना फायदा: ६ रुपयांचे तिकीट घेणाऱ्या प्रवाशांसाठी ५९ रुपये खर्च करून ७ दिवसात १५ वेळा प्रवास करता येणार आहे. २९९ रुपये खर्च करून २८ दिवसात १५० वेळा प्रवास करता येणार आहे. १३ रुपये तिकीट घेणार्या प्रवाशांसाठी १५९ रुपये खर्च करून ७ दिवसात १५ वेळा तर ७४९ रुपये भरून २८ दिवसात १५० वेळा प्रवास करता येणार आहे. ५० रुपयांचे दैनंदिन तिकीट घेऊन दिवसभर बसमधून प्रवास करता येणार आहे. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांना २०० रुपयात ३० दिवसात ६० वेळा प्रवास करता येणार आहे.
प्रवासी संख्या वाढली: बेस्टच्या ताफ्यात स्वतःच्या मालकीच्या १८५४ बसेस आहेत. भाडेतत्त्वावरील १७९३ बसेस आहेत. स्वतःच्या व भाडेतत्त्वावरील अशा एकूण ३६२७ बसेस बसच्या ताफ्यात आहेत. बेस्टमधून कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वी सुमारे २८ लाख प्रवासी प्रवास करत होते. कोरोना दरम्यान लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असलेले १२ लाख प्रवासी प्रवास करत होते. त्यानंतर नवनवीन प्लॅन्स जाहीर केल्याने प्रवाशांची संख्या ३४ लाखांवर गेली आहे. अशी माहिती बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा: CBI Summonsed Kejriwal: केजरीवाल अडकणार? दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्यात चौकशीसाठी सीबीआयकडून समन्स