मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ मार्च 2022 संपल्यावर पालिकेत आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती ( Appointment of commissioner as administrator ) करण्यात आली आहे. गेले नऊ महिने पालिकेत प्रशासक राज्य सुरू ( Administrator state started in municipality ) आहे. या कालावधीत पालिका आयुक्तांचा अपारदर्शक कारभार सुरू असल्याचा आरोप राजकीय पक्ष करत आहेत. त्यातच आता आयएएस अधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देऊ नये असा फतवा पालिका आयुक्तांनी काढला आहे. यामुळे पालिका आयुक्तांच्या विरोधामध्ये प्रसार माध्यम आणि प्रतिनिधींमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
पालिकेच्या प्रतिमेस धक्का पोहचतो : पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त शहर, सह आयुक्त सामान्य प्रशासन यांच्या सहीने एक परिपत्र काढण्यात आले आहे. या परिपत्रकात पालिका अधिकारी प्रसारमाध्यमांना माहिती देतात यामुळे उलट सुलट माहिती प्रसारित होऊन महानगरपालिकेच्या जनमानसात असलेल्या प्रतिमेस धक्का पोहचतो. यासाठी यापुढे बृहन्मुंबई महानगरपालिकेबाबतची कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी फक्त महानगरपालिका आयुक्त व संबंधित अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त हेच सक्षम प्राधिकारी असतील. इतर अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देवू नये असे असे परिपत्रकात म्हटले आहे.
पत्रकारांमध्ये संतापाची लाट : पालिका आयुक्त असलेले इकबाल सिंग चहल हे पत्रकारांना भेटत नाहीत. अतिरिक्त आयुक्त असलेल्या अश्विनी भिडे यासुद्धा पत्रकारांना भेटत नाहीत. अतिरिक्त आयुक्त असलेले संजीव कुमार यांच्याकडे गेलेल्या पत्रकारांना चहा पाजला जातो, मात्र माहिती मिळत नाही. अतिरिक्त आयुक्त असलेले पी वेलारासू आणि आशिष शर्मा हे दोघेच कधी तरी पत्रकारांना भेटतात. यामुळे जे अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त पत्रकारांना भेटतच नाहीत त्यांच्याकडून पत्रकारांना माहिती मिळणार का असा प्रश्न पत्रकारांना पडला आहे. पालिकेत प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यापासून आयुक्तांनी एकही प्रस्ताव पत्रकारांना दाखवलेला नाही. त्यातच आता अधिकाऱ्यांनी माहिती देवू नये असा फतवा काढल्याने आयुक्तांच्या विरोधात पत्रकारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
काय लिहिले आहे पत्रात : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने विविध प्रसारमाध्यमांना माहिती देणेबाबत. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध नागरी सुविधा व उपक्रम यांचे अनुकरण बऱ्याचदा देशातील इतर महानगरपालिका करतात. त्याचे बरे-वाईट परिणाम बृहन्मुंबई क्षेत्रातील नागरिकांसह इतर महानगरातील नागरिकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या होतात. यास्तव, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, उपक्रम तसेच आपत्कालीन घटना यांची माहिती सर्व गोष्टींचा सारासार विचार करुन प्रसारमाध्यमांना देणे आवश्यक आहे. परंतु, असे निदर्शनास आले आहे की, महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशाशिवाय बऱ्याचदा विभाग, खाते प्रमुख है प्रसारमाध्यमांना परस्पर माहिती पुरवितात. यामध्ये धोरणात्मक बाबींचाही समावेश असतो. त्यामुळे बऱ्याचदा उलट-सुलट माहिती प्रसारित होऊन महानगरपालिकेच्या जनमानसात असलेल्या प्रतिमेस धक्का पोहचतो. यास्तव, यापुढे बृहन्मुंबई महानगरपालिकेबाबतची कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी फक्त महानगरपालिका आयुक्त व संबंधित अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त हेच सक्षम प्राधिकारी असतील. 'अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त या दर्जापेक्षा कमी दर्जा असणारे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी हे बृहन्मुंबई महानगरपालिकेची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यास प्राधिकृत नाहीत, याची सर्वानी नोंद घ्यावी.