मुंबई- राज्यात नवीन वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी नवीन सरकार स्थापन होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आज विधानभवन परिसरात दिली. राज्याचे सहावे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरात असलेल्या त्यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह विधान भवनातील अधिकारी आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी अभिवादन केले. त्यावेळी अजित पवार यांनी ही माहिती दिली.
अजित पवार म्हणाले की, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिल्लीमध्ये होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते हे राज्यात होते. कालपासून चर्चा सुरू होती. आता आमची पाच लोकांची समिती गठित करण्यात आली आहे. त्यात माझ्यासह धनंजय मुंडे, जयंत पाटील, छगन भुजबळ आणि नवाब मलिक हे आहेत. ही समिती काँग्रेसबरोबर चर्चा करून त्यात साधारण सर्वसमावेशक असा कार्यक्रम ठरेल, आणि त्यातून चर्चा केल्यानंतर त्यात एकवाक्यता झाल्यानंतर ते वरिष्ठांच्या कानावर घालून पुढील दिशा ठरेल, असे अजित पवार यांनी सांगितले.
त्याचबरोबर, आम्ही दोन्ही पक्ष हे शिवसेनेसोबत चर्चा करू. तोपर्यंत शिवसनेने आपली भूमिका आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करून ठरवावी. आम्हाला राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन करायचे आहे. राज्यातील शेतकरी हा त्रासून गेला आहे. या सगळ्या गोष्टी पूर्णपणे राज्यपाल आणि दिल्लीच्या हाती गेल्याने जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधींचे सरकार आले पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज आम्ही कार्यवाही सुरू केलेली आहे. आम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमचे प्रांताध्यक्ष यांना लवकरात लवकर चर्चा सुरू करा, असे सांगणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
आज आमच्या आमदारांच्या झालेल्या बैठकीत राष्ट्रपती राजवट झाल्यानंतर पुढील राजकीय परिस्थिती काय राहणार आहे, याचे मार्गदर्शन पवार यांनी केले. त्यांचेही अधिवेशन सुरू असल्याने हे सगळे दिल्लीला जातील, त्यामुळे आमची समिती सेनेसोबत चर्चा करेल, असेही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा- घाटकोपरच्या महिला महाविद्यालयातील युवती करणार काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास