मुंबई - लोकसभेसाठी प्रत्येक पक्षाने आपआपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर, अनेक विद्यमान खासदारांचे पत्ते कट करण्यात आले आहे.
भाजपने शुक्रवारी मध्यरात्री महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे, सोलापूरचे खासदार शरद बनसोडे, दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि जळगावचे खासदार ए. टी. नाना पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्याऐवजी पक्षाने पुण्यातून पालकमंत्री गिरीश बापट, दिंडोरी या राखीव मतदारसंघातून डॉ. भारती पवार, जळगावमधून स्मिता वाघ आणि सोलापूरमधून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. तर, बारामतीमध्ये आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरूद्ध कांचन कुल असा सामना होणार आहे. कुल या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून नुकतेच भाजपमध्ये आलेले सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कापण्यात आला आहे. तर, लातूर मतदारसंघातून विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचा पत्ता कापून सुधाकरराव शृंगारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शृंगारे हे वडवळ नागनाथ येथून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. ते पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचे निकटवर्तीय मानले जातात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा मतदार संघातील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मोहिते यांचे कट्टर विरोधक संजयमामा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर करून रंगत आणली आहे. दरम्यान, भाजपकडून अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही.
शिवसेनेकडून देखील उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यांच्या जागेवर ओमराजे निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राणाजगजितसिंह पाटील यांना संधी देण्यात आली आहे.