मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. हे पत्र लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या हॉटेल-बार व्यवसायिकांसंबंधी आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेक व्यवसायांवर याचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्या शरद पवारांच्या कानावर घातल्या आहेत. त्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रव्यवहार केला आहे.
काय आहे पत्रात?
1. एफल-3 परवानाधारक हॉटेल-परमीटबार मालकांना अबकारी कराचा भरणा किमान 4 हप्त्यांमध्ये करण्याची सवलत द्यावी.
2. वीज बिलात सवलत मिळावी, तसेच मालमत्ता करात सूट मिळावी.
3. महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाच्या धरतीवर राज्यातही उद्योग-व्यवसायाला संजिवनी देणारी, रोजगाराला प्रोत्साहन देणारी योजना राबवावी.
अशा मागण्या शरद पवारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केल्या आहेत.
तसेच, 'परमीटरूम व आदरातिथ्य उद्योग क्षेत्रातील व्यवसायिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने या मागण्यांचा आपणाकडून सहानुभूतीपूर्वक विचार होईल, अशी मी आपणाकडून अपेक्षा करत आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली कोरोना संकटातून जनतेला दिलासा मिळेल याचा मला विश्वास आहे', असेही पवारांनी पत्रात म्हटले आहे.
पवार पुन्हा सक्रिय
दरम्यान, तब्बल पंधरा दिवसानंतर पवार पुन्हा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. प्रथम एंडोस्कोपीद्वारे त्यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तोंडातील अल्सर काढण्यात आला. ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर मागील दोन आठवड्यात तीन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याची माहिती राज्यमंत्री नवाब मलिक यांनी दिली होती.
हेही वाचा - मराठा आरक्षण : गरज पडल्यास एक दिवसीय अधिवेशन घेऊ - अजित पवार
हेही वाचा - 'खासदार-आमदारांना आडवा', मराठा आरक्षणावरून उदयनराजे भडकले