मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १२ दिवस झाले आहेत. भाजप आणि शिवसेनेत सरकार स्थापनेवरून खडाजंगी सुरू आहे. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना हे नवी समीकरणे राज्यात तयार होऊ पाहत आहे. त्यात राज्यात काही होवू शकतं, असे वक्तव्य करून शरद पवारांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चलबिचल करून टाकली आहे. त्यात भर म्हणून की काय, सेनेच्या संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे राज्यात नवीन राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेकडून अद्यापही प्रस्ताव आलेला नाही. मात्र, प्रस्ताव आल्यास आम्ही सेनेसोबत जाण्याचा विचार करू, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते. त्यातच राज्यात सेना, राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होऊन काँग्रेस त्याला बाहेरून पाठिंबा देईल, अशी चर्चा देखील होत आहे. मात्र, सोमवारीच शरद पवार यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मात्र, सरकार स्थापन करण्याबाबत किंवा पाठिंबा देण्याबाबत अद्यापही विचारणा केलेली नाही. आम्ही कुणाशीही संवाद साधणार नाही. तरीही सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर राज्यातील नेत्यांशी चर्चा करणार. मात्र विरोधीपक्षातच बसणार असे त्यांनी ठामपणे सांगितले नाही. उलट राज्यात काही होवू शकते, असं सांगत त्यांनी पुढील सस्पेन्स कायम ठेवला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. मात्र, यावेळी त्यांना सत्तास्थापनेबाबत विचारले असता ते म्हणाले, लवकरच नवीन सरकार स्थापन होणार. मात्र, त्यांनी यामध्ये महायुतीचा उल्लेख केलेला नाही. तसेच मुख्यमंत्रीपदाबद्दल भाजपमधून कोणीही बोलणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले. त्यातच सेनेचे संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच यावेळी राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले आणि आज मुख्यमंत्री सेनेचाच होणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
राज्यात सत्ता स्थापनेसाठी नवीन समीकरणे जुळली, तर १९९५ चाच फॉर्म्युला वापरण्यात येईल. मात्र, त्यामध्ये पक्ष बदललेली असेल, असेही बोलले जात आहे. त्यामुळे आता शरद पवार राज्यातील नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.