मुंबई : याप्रसंगी बोलताना बावनकुळे म्हणाले की, भाजपसोबत येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडून कुठलाही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. तेव्हा या कारणावरून पवारांना वारंवार आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, असे आवाहन देखील बावनकुळेंनी केले. अजित पवार राष्ट्रवादीच्या १० ते १५ आमदारांचा स्वतंत्र गट तयार करून भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा गेल्या आठ दिवसांपासून रंगल्या आहेत. भाजपच्या विचारधारेवर कुणालाही पक्षात प्रवेश दिला जातो. आमचे ते कामच आहे; कारण आम्ही पक्ष वाढवण्यासाठीच काम करतो. यासाठी विश्वासाचे राजकारण आम्ही करत आहोत; परंतु अजित पवारांकडून कुठलाही प्रस्ताव किंवा तशी चर्चा झाली नसल्याचे बावनकुळे म्हणाले.
अजित दादांची साथ काळाची गरज : अजित पवारांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडल्यानंतर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पत्रकार परिषद घेतली. अजित पवारांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याचा विषयच येतच नाही; परंतु गतकाळात एखादी घटना घडली असेल तर ती, कशामुळे घडली हेसुद्धा पाहण्याची गरज असल्याचे सांगत २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवारांनी घेतलेल्या शपथविधीची बावनकुळे यांनी आठवण करून दिली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी आणि जनतेशी विश्वासघात केला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून जनतेने आम्हाला बहुमत दिले होते; पण ठाकरे यांना ते मान्य नव्हते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र आल्याचा तो अपरिहार्य निर्णय होता. यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करू नये, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
प्रवेशासाठी अनेकांच्या रांगा : बावनकुळे म्हणाले की, आम्हाला महाराष्ट्रसह सर्व स्तरातून समर्थन मिळत आहे. मागील काही दिवसात माझी आणि अजित पवारांची भेट झाली नसल्याने ते अस्वस्थ की आनंदात आहेत याची मला माहिती नाही, असे म्हणत त्यांनी उत्तर देणे टाळले. तसेच २०२४ मध्ये आम्ही महाविजय मिळवू. प्रत्येक पक्षाचे पक्षवाढीचे काम सुरू असून फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेशासाठी अनेकजण रांगा लावत असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.
हेही वाचा: Ajit Pawar On Sanjay Raut: आमच्या पक्षाचे वकीलपत्र घेऊ नका; अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले