मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या असून त्यामध्ये तीन ठिकाणी दोन्ही पक्षांकडून उमेदवार देण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक मतदारांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षाकडून झालेली चूक आम्ही अर्ज छाननी यादरम्यान दुरुस्त करून घेऊ. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी दिली.
हेही वाचा - शिवसेनेने दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून मी राष्ट्रवादीत आलो - आमदार अमित लोडा
काही ठिकाणी चुकून असे प्रकार झाले आहेत. याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माणिकराव ठाकरे यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यामुळे अर्जाची अंतिम छाननी झाल्यानंतर आणि अर्ज मागे घेण्याची मुदत आहे त्यावेळी त्यासंदर्भातली दुरुस्ती दोन्ही पक्षाकडून केली जाईल. अशाप्रकारे दोन्ही पक्षांनी संमती दिली असल्याची माहितीही पवार यांनी दिली.
काँग्रेस राष्ट्रवादीकडून पंढरपूर आणि अहेरी या दोन विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा - 'ईडी'च्या प्रेमप्रकरणातून पक्षांतर वाढले - शरद पवार
भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्यासोबत आपला संपर्क झाला आहे का असे विचारले असता पवार म्हणाले की, माझा एकनाथ खडसे यांच्याशी तसा काही संपर्क झालेला नाही. मात्र, धनंजय मुंडे यांनी संपर्क झाला असल्याचे म्हटले जात असले, तरी त्याबद्दल मला काही माहिती नाही. आमच्या आघाडीतील जे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे. आजही मी दिवसभर तीच चर्चा करत होतो. उद्या शेवटचा दिवस असल्याने कोणत्याही घटक पक्षांना अडचण येऊ नये याविषयीची चर्चा आज दिवसभर सुरू होती. अशी माहिती पवार यांनी दिली.
वरळीच्या जागे संदर्भात पवार महणाले की,आमच्या आघाडीतील काही जणांनी वरळी येथे अर्ज भरलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. अजूनही काही जण अर्ज भरत आहेत. काहीजण शुक्रवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे छाननीनंतर त्याठिकाणी कोणाचा अर्ज राहील आणि कोणाच निघणार हे ठरेल. त्यामुळे 5 तारखेला छाननी झाल्यानंतर 6 तारखेला आम्ही पुन्हा आघाडीतील सर्वजण बसून त्यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेवू असे पवार यांनी सांगितले.