मुंबई - धारावी परिसरातील एका नाल्यात पडून एका 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचा निषेध करत मुंबई महानगरपालिकेवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
गेल्या 10 वर्षात 3 लाख कोटी रुपयांचे बजेट महापालिकेने मंजूर करून घेतले आहे. मात्र, शहरातील कचऱ्याची, गटारांची काळजी घेतली नाही. त्यामुळे हे 3 लाख कोटी रुपये गेले कुठे? असा सवालही जयंतराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या गलथान कारभाराने कळस गाठला आहे. आज 7 वर्षीय अमीत जैस्वाल या चिमुरड्याचा गटारात पडून मृत्यू झाला आहे. दिव्यांशू सिंग हा 3 वर्षांचा चिमुरडा गोरेगावमधून ५ दिवसांपासून बेपत्ता आहे. बबलू कुमार या १२ वर्षीय मुलाचा वरळी येथील कोस्टल रोडच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. मागील २ वर्षांपूर्वी दिपक अमरापुरकर या बॉम्बे हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांचा असाच पाण्यात वाहून मृत्यू झाला होता. या सर्व मृतांची जबाबदारी पालिकेने घेतली पाहिजे, अशी मागणीही जयंतराव पाटील यांनी केली आहे.