मुंबई - लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला फारसे यश मिळाले नाही. ही बाब निवडणुकीनंतर लक्षात आल्यावर आता राष्ट्रवादीने आपला मोर्चा शहराकडे वळवला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच याविषयी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात, राष्ट्रवादीचा बनलेला ग्रामीण चेहरा आता शहरी झाला पाहिजे, असे म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादीचा ग्रामीण भागासोबतच शहरी भागावरही तितकाच फोकस राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला शहरी भागात म्हणावे तसे यश मिळाले नाही. मावळ, ईशान्य मुंबई, ठाणे आदी शहरी भागातील लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. यात शहरी भागातील मतदारांनी राष्ट्रवादीला पसंत केले नसल्याचे यातून समोर आल्याने आता राष्ट्रवादी यापुढे शहरी भागात आपले पाळेमुळे मजबूत करणार आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीला ग्रामीण चेहरा होता तो विधानसभा निवडणुकीदरम्यान शहरी चेहराही मिळणार असून यावेळी मोठया प्रमाणात राष्ट्रवादी शहरी भागात आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे.
काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या 20 व्या वर्धापन दिनाचा सोहळा पार पडला. त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा चेहरा ग्रामीण केला आहे. तो आता शहरीही झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले की, राज्यात 50 टक्के लोक नागरी भागात असतात, प्रत्येक तालुक्यात नागरिकरण झालेले आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण यशस्वी होणार नाही. नागरी भागात पक्षाची व्याप्ती वाढवण्यासाठी भर देऊया. नागरी प्रश्नासाठी संघर्ष करायला त्यासाठी जनमानस तयार करावा लागेल, मुंबईत सगळ्या घटकांना सोबत घेऊन जायचे आहे. काय स्थिती असेल ते पाहून जागा घ्यायचा निर्णय घ्या, अशी सूचना त्यानी पक्षातील नेत्यांना केली. इतकेच नाही, तर महापालिकेवर लक्ष ठेवा आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्या. निवडणुकीत कामाच्या पद्धतीत बदल करून. फेसबुक, ट्विटर आदी समाज माध्यमांचा वापर करून आपल्या कामात आधुनिकता येऊ द्या, असेही आवाहन त्यांनी केले. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शहरी भागातही अधिक लक्ष देणार असल्याचे स्पष्ट आहे.