मुंबई - राज्यातील पुराची गंभीर परिस्थिती पाहता, शासनाने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन, केंद्र सरकारकडून तातडीने ४ हजार कोटींची मदत घ्यावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे जून अखेरपर्यंतचे थकीत कर्ज सरकारने माफ करावे. तसेच नवीन कर्ज तातडीने उपलब्ध करावे, अशा प्रमुख मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केल्या.
राज्यातील पूरपरिस्थितीबाबत राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात म्हणून ५० लाख रुपयांचा धनादेशही मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. यावेळी पुरग्रस्तांच्या पुनर्सवनाबाबत मागण्याही करण्यात आल्या.
मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या मागण्यांबाबत तत्काळ पूर्तता करावी. मुख्यमंत्र्यांनी पूर्तता केली नाही तर लोकांच्या प्रचंड रोषाला सामोरं जावं लागेल. पूरपरिस्थिती असताना सरकारमधले मंत्री बेजबाबदार वागत होते. या मंत्र्यांवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांमध्ये हिम्मत नसल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
पाण्याखाली असणाऱ्या सर्व पिकांना तसेच ऊस, आंबा, काजू इतर फळबागांना हेक्टरी एक लाख रुपये, भाताला ५० हजार, नाचणीला ४० हजार अनुदान द्यावे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत जाहीर करावी. पूरग्रस्त बांधवांना उठून उभे करण्यासाठी सरकारने तातडीने लक्ष घालावे.