मुंबई - राज्यातील दुष्काळाची परिस्थिती आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही बैठक बोलावली असून, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसह जिल्हाप्रमुखांना या बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात चार दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससह राज्यात महाआघाडी स्थापन करून निवडणूक लढवली. यावेळी पक्षाकडून काही अपवाद वगळत राज्यातील अनेक जागांवर नव्या चेहऱ्यांना आणि तरूणांना संधी दिली गेली. त्यात बीड, मावळ, शिरुर आदी मतदारसंघाचा समावेश होता.
केंद्र सरकारच्या विरोधातील नाराजीचा मोठा लाभ महाआघाडीच्या उमेदवारांना मिळल्यास, राष्ट्रवादी यावेळी १० हून अधिक जागा मिळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ही आढावा बैठक नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये आज दुपारी २ वाजता होणार आहे. त्यानंतर ४ वाजता याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे.