मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) 2 ठिकाणी छापेमारी केली. याप्रकरणी 3 जणांना अटक करून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे. 15 एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्यामध्ये एका आफ्रिकन तस्करचाही समावेश आहे.
घरातच केली जात होती अमली पदार्थांची शेती-
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी या अगोदर अटक केलेल्या एका अमली पदार्थ तस्कराची चौकशी केली. या चौकशीमध्ये मुंबईसह, ठाणे, डोंबिवली, परिसरामध्ये अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या जावेद जहांगीर शेख व अर्षद खत्री या दोन आरोपींची नावं कळाली. या दोन आरोपींना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी डोंबिवली येथील पलावा सिटी येथील एका घरामध्ये हाड्रोपोनिक गांजाची लागवड करत असल्याचे सांगितले. पलावा सिटी येथील एका टू बीएचके फ्लॅटमध्ये अमली पदार्थाचे उत्पादन हे दोन्ही आरोपी घेत असल्याचे समोर आले. पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. त्यात हायड्रोपोनिक गांजाचे उत्पादन घेण्यासाठी लागणारी बियाणे, झाडे व इतर साहित्य जप्त केले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या माहितीनुसार ज्या घरामध्ये गांजाचे उत्पादन घेतले जात होते ते घर रेहान खान या सौदी अरबमध्ये असलेल्या व्यक्तीच्या नावावर आहे. त्याने दिलेल्या आर्थिक मदतीवर हायड्रोपोनिक गांजाचे उत्पादन घेतले जात होते.
साहित्यासाठी डार्क नेटचा वापर-
हे आरोपी गांजाचे झाड उगवण्यासाठी लागणारे साहित्य डार्क नेटच्या माध्यमातून नेदरलँड्स, ॲम्स्टरडॅम येथून मागवत होते, असे समोर आले आहे. हायड्रोपोनिक नावाने ओळखले जाणारे हे अमली पदार्थ तब्बल 2500 प्रति ग्राम विकले जाते. उच्चभ्रू वर्गात याची मोठी मागणी आहे.
आफ्रिकन तस्कराला अटक -
या बरोबरच मुंबईत केलेल्या कारवाईदरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सॅम्युअल माईक या आफ्रिकन वंशाच्या अमली पदार्थ तस्कराला अटक केली आहे. त्याच्याकडून 30 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून मुंबईतील अंधेरी, बांद्रा, सांताक्रुज, परिसरामध्ये हे कोकेन अमली पदार्थ विकले जात होते.