मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात यश मिळवले आहे. एनसीबीच्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 'सिंडिकेट'चे धाबे दणाणले आहेत. एनसीबीने 1.403 किलो एमडीएमए (MDMA), 0.26 ग्रॅम एलएसडी आणि 1.840 किलो गांजा जप्त केला आहे.
टपाल ऑफिसमार्फत तस्करी : याप्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर इतरांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती एनसीबीकडून देण्यात आली आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सिंडिकेटबद्दल माहिती गोळा केली गेली होती. या माहितीत युरोप आणि यूएसएमधून अनेक प्रकारच्या ड्रग्जची तस्करी करण्याचा कट दिसून येत होता. त्यानुसार तांत्रिक पाळत ठेवण्यावर विशेष भर देऊन विविध गुप्तचर यंत्रणेला सतर्क केले. याचा तपास करताना एसीबीने 23 मे 2023 रोजी अमेरिकेमधून पुण्यात पाठवण्यात आलेल्या एका संशयित पार्सलची तपासणी केली. हे पार्सल टपालामार्फत पाठवण्यात आले होते. एनसीबीने मुंबईतील फॉरेन पोस्ट ऑफिसात या पार्सलची तपासणी केली. या तपासणीत एनसीबीच्या अधिकाऱ्यांना 100 एमडीएमए टॅब्लेट आणि 24 एलएसडी ब्लॉट पेपर्स पोर्टेबल ऑडिओ सिस्टममध्ये लपवण्यात आल्याचे आढळून आले.
पुण्यातील ड्रग्स सिडिंकेट : याप्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर या तस्करीत एस. कश्यप नावाच्या संशयित आरोपीचा सहभाग असल्याचे उघड झाले. या संशयित आरोपीचा बेकायदेशीर कारवायांशी संबंध असल्याची माहितीही एनसीबीला मिळाली. त्यानंतर एनसीबीने 10 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या मदतीने कश्यपला पकडले. त्यानंतर एनसीबीने त्याची चौकशी केली. कमिशनच्या बदल्यात कश्यप परदेशी हँडलरकडून अंमली पदार्थ खरेदी करत असायचा. त्याने पुण्यात विविध ठिकाणी अंमली पदार्थाचे वितरण केल्याची माहिती एनसीबीच्या चौकशीतून समोर आली आहे. दरम्यान पार्सल शिपमेंटची तपासणी केल्यानंतर एनसीबीला पुण्यातील 'ड्रग्ज सिडिंकेट'चा पदार्फाश करता आला.
मोठ्या प्रमाणात गांजा जप्त : 4 जुलै 2023 रोजी एक संशयित पार्सल एनसीबीने मुंबईतील फॉरेन पोस्ट ऑफिसमध्ये तपासले होते. हे पार्सल यूएसएमधून आले होते. या पार्सलमध्ये चार डबे होते, त्यात 1.840 किलोग्रॅम वजनाचा बारीक केलेला हायड्रोपोनिक गांजा होता. या पार्सलचा तपास सुरू केला तेव्हा अदनान एफ नावाची व्यक्ती एनसीबीच्या हाताला लागली. एनसीबीने अदनानला अटक केली असून अदनान हा पार्ट्यांमध्ये बेकायदेशीरपणे अंमली पदार्थ पुरवत असल्याचे उघडकीस आल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली. दरम्यान एनसीबीने अदनानसह आणखी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याचाही या अंमली पदार्थ तस्करीत सहभाग असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.
1.363 किलोग्रॅम एमडीएमए जप्त : या कारवाईनंतर एनसीबीने 21 जुलै 2023 रोजी नेदरलँडहून मुंबईला आलेले आणखीने एक पार्सल तपासले. याची तपासणी केली असता यात एमडीएमए टॅब्लेट आढळून आल्या. घरगुती वस्तूंमध्ये या टॅब्लेट लपवण्यात आल्या होत्या. या घरगुती वस्तूंमध्ये तब्बल 2 हजार 817 एमडीएमएच्या टॅब्लेट्स (वजन 1.363 किलोग्रॅम) होत्या. त्या एनसीबीने जप्त केल्या आहेत. याचा तपास करत असताना एनसीबीला अर्जुन जी नावाने ओळखला जाणारा तस्कर या तस्करीत सहभागी असल्याचे समजले. हा कथित अर्जुन जी नालासोपारा येथे राहतो. सध्या अर्जुन अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात अटक आहे. अटक होण्यापूर्वी अर्जुनला अनेक अंमली पदार्थांचे पार्सल मिळाले होते. यावरुन तो अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात सहभागी असल्याचे दर्शवत असल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा-
- Mumbai Crime News : डार्कनेटच्या सहाय्याने ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांचा भांडाफोड, एक कोटींच्या ड्रग्स जप्तीसह एका नायजेरियन व्यक्तीस अटक
- Pune Crime : 2 कोटी 10लाखाचे मेफेड्रॉन जप्त, पुण्यात A R रहमानच्या कॉन्सर्ट अगोदर पोलिसांची मोठी कारवाई
- Mumbai Crime News: मुंबईला अमली पदार्थांचा विळखा; 10 कोटींचा एमडी ड्रग्स केला जप्त, वांद्र्यातून तिघांना अटक