मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाला असून त्याचे स्वागत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून केले जात आहे. नवाब मलिक शरद पवार यांच्या गटासोबत राहणार की, अजित पवार गटात सामील होणार यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. याच मुद्द्यावर बोलताना शिंदे गटाचे नेते, मंत्री दीपक केसरकर यांनी हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असल्याचे भाष्य केले आहे. तसेच राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीची दुसरी टीम ही लवकरच भाजप सोबत जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यावर बोलताना केसरकर यांनी राज ठाकरेवर बोलणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. मुंबईत ते बोलत होते.
नवाब मलिकांवरील आरोप कायम: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना गोवावाला कंपाऊंडमधील मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीने मागच्या वर्षी २३ फेब्रुवारी २०२२ ला अटक केली होती. मागील दीड वर्षांपासून ते जेलमध्ये आहेत. आता तब्येतीच्या कारणासाठी सर्वोच्य न्यायालयाने नवाब मलिकांना जामीन मंजूर केला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट तयार झाले आहेत. अशात नवाब मलिक हे शरद पवार गटासोबत जातात की, अजित पवार गटासोबत राहतात हा प्रश्न निर्माण झाला आहे. याविषयी शिंदे गटाचे नेते मंत्री दीपक केसरकर यांना विचारले असता हा सर्वस्वी ज्यांच्या त्यांचा प्रश्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर नवाब मलिक यांच्यावर आरोप झाले आहेत. त्या आरोपातून त्यांना अद्याप मुक्तता भेटली नाही. म्हणून ते अजित पवार गटासोबत आले. तरीसुद्धा त्यांना सोबत घ्यायचे की नाही हा सुद्धा एक प्रश्न असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.
अजित पवार कार्यक्षम नेते: दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर लवकरच पवारांची दुसरी टीमसुद्धा भाजप सोबत सत्तेत सामील होईल, अशा पद्धतीचे ट्विट केले होते. आज त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. याविषयी दीपक केसरकर यांना विचारले असता, राज ठाकरे यांच्या बाबत बोलणे उचित होणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच अजित पवार हे कार्यक्षम नेते असून प्रत्येक गोष्टीचे फायदे-तोटे असतातच. त्याचा योग्य फायदा कसा होईल हे अजित पवारांना चांगले समजते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा: