मुंबई - केंद्र सरकारच्या नवीन तिन्ही कृषी विषयक कायद्यांना महाविकास आघाडी सरकारचे सर्व तीन पक्ष (राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस) हे विरोधात होते आणि राहणार आहेत. विधानसभेमध्ये या कायद्याविरोधात ठराव संमत करून आम्ही विरोध करणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
कुठलाही कायदा हा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता होणार नाही -
महाराष्ट्र विकास आघाडीचे सर्व तीन पक्ष हे केंद्र सरकारच्या नवीन शेतीविषयक कायद्याच्या विरोधात आहेत. यासाठी विधानसभेत या कायद्यांच्या विरोधात ठराव संमत करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमितीही नियुक्त करण्यात आलेली आहे. त्या समितीने या कायद्याबाबत विविध सूचना देखील केलेल्या आहेत. विविध शेतकरी संघटनासोबत चर्चा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि चर्चा करुनच सरकार पुढे जाणार आहे. कुठलाही कायदा हा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता होणार नाही आहे. असे ते यावेळी म्हणाले.
उत्तरप्रदेश निवडणूकीत भाजपा हारेल -
दबाव, पैसा आणि गुंडगिरीचा वापर करुन काही लोकांच्या मते मिळवली जात आहेत. भाजपाने अधिक जिल्हा परिषद निवडणुका जिंकल्या असा भ्रम निर्माण करण्यात आला आहे. उत्तरप्रदेश मधील २० करोड लोकांचा पाठिंबा मिळाला असे नाही. तर तेथे परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. जेव्हाही निवडणूका होतील त्यावेळी भारतीय जनता पार्टी हारेल. असा टोला त्यांनी बीजेपीला लगावला आहे.