मुंबई : कोल्हापूरमधील कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संंबंधीत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मनी लाॅंड्रींग कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन ईडी तपास करत आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी मुश्रीफांच्या घर, कार्यालयावर छापेमारी केल्यानंतर त्यांना सोमवारी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चाैकशीला हजर राहाण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र मुश्रीफांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मुश्रीफांना दोन आठवड्यांसाठी अटकेपासून संरक्षण दिले. त्यानंतर मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मुश्रीफ ईडीच्या मुंबईतील कार्यालयात हजर झाले. सुमारे दीड तास ते ईडी कार्यालयात होते.
उद्या परत होणार ईडी चौकशी : ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर मुश्रीफांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली. ईडीने आपल्याला समन्स बजावला होता. त्यानुसार मी ईडीकडे वेळ मागत न्यायालयात गेलो होतो. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर तातडीने ईडी कार्यालयात आलो आहे. त्यांचे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना उत्तर देणार असून; ईडीला सहकार्य करणार आहे. काही अधिकारी बाहेर आहेत. त्यामुळे त्यांनी मला आज (बुधवारी) परत बोलावले आहे. विधिमंडळाचे कामकाज आटोपून ईडी कार्यालयात चौकशीसाठी येणार आहे, असे सांगितले.
सगळ्या आरोपांवर खुलासा करेन : मी याचिकेत सर्व लिहिले आहे. नेमके काय सुरु आहे ते सविस्तर लिहिले आहे. दोन दिवसांपूर्वी निकाल आलेला आहे. त्यामध्ये स्वत: न्यायमूर्तींनीच त्याबद्दल भाष्य केले आहे. आता फक्त ईडीच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची आहेत. त्यांना आणखी काही कागदपत्रे देखील द्यायची आहेत. मी सगळ्या आरोपांवर खुलासा करेन, असे मुश्रीफ माध्यमांशी बोलताना म्हणाले.
काय आहे विषय? : साखर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला होता. मुश्रीफ यांच्या नातेवाईकांनी साखर कारखाना खरेदी केल्याचा आरोप केला होता. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांनंतर ईडीकडून त्यांची चौकशी केली जात आहे.