मुंबई Rajya Sabha MP : नव्या वर्षात राज्यसभेतील 68 खासदारांचा कार्यकाळ संपणार असल्यानं ते निवृत्त होणार आहेत. यात 9 केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. तर 68 पैकी 6 खासदार हे महाराष्ट्रातील आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. या खासदारांना पुन्हा संधी मिळणार की पक्षाकडून त्यांना नारळ देण्यात येणार याबाबत अनेक चर्चा करण्यात येत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नारायण राणे यांचं काय होणार? त्यांचा लोकसभेसाठी पक्ष विचार करणार का? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत असून, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
नारायण राणेंचं मंत्रिपद कायम राहणार? : एकीकडे राज्यसभेत एकूण 68 खासदारांचा कार्यकाळ संपत असताना यामध्ये महाराष्ट्रातील 6 खासदारांचा देखील कार्यकाळ संपत आहे. पण जर राज्यातील विचार केल्यास नारायण राणे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार नाही. त्यांचं मंत्रिपद कायम ठेवलं जाईल, असं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटलं आहे. याचं कारण सांगताना ते म्हणाले "नारायण राणे कुटुंबाला भाजपात फक्त उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी घेतलं आहे. नारायण राणे आणि त्यांची दोन मुलं ही सतत पातळी सोडून उद्धव ठाकरेंवर टीका करत असतात. ठाकरे गटाचं कसं खच्चीकरण करता येईल, हा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यासाठी भाजपा राणेंचा वापर करत आहे. दरम्यान, राणेंचा दोन मुलांना आमदारकीसाठी उमेदवारी दिली जाईल आणि नारायण राणेंना लोकसभेवर घेतलं जाईल," असाही अंदाज जयंत माईणकर यांनी वर्तवला आहे. " नारायण राणेंना दूर करणे किंवा त्यांना दुखावणं भाजपाला परवडण्यासारखं नाही. त्यामुळं राणेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार नाही," असं निरीक्षण जयंत माईणकर यांनी नोंदवलंय.
महाराष्ट्रातील खासदारांचं काय होणार : "प्रकाश जावडेकर यांची सध्याची कामगिरी पाहता त्यांना पक्ष खासदाराकीसाठी पुन्हा संधी देईल, असं वाटत नाही. कारण ते जर अॅक्टिव असते तर त्यांना मंत्रिपदावरुन काढलं नसतं. तर अनिल देसाईंना ठाकरे गटाकडून पुन्हा संधी मिळू शकते. कारण अनिल देसाई हे पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळं त्यांना संधी मिळू शकते. वंदना चव्हाण यांचं आत्ताच काही सांगता येणार नाही. कुमार केतकर यांना काँग्रेसकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळं केतकरांच्या जागी दुसरा उमेदवार काँग्रेस देईल," असं देखील राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटलं आहे.
खासदार हा भाजपाचाच असावा - नितेश राणे : लोकसभेसाठी पक्षाकडून सिंधुदुर्गमधून नारायण राणे यांना उमेदवारी मिळू शकते का? असा प्रश्न भाजपा आमदार नितेश राणे यांना विचारला होता. यावेळी त्यांनी "सिंधुदुर्ग मतदारांची आणि पक्षांची इच्छा आहे की, लोकसभेसाठी सिंधुदर्गमधून कमळ चिन्हाचाच खासदार असावा. तसेच येथून भाजपाचाच खासदार निवडून येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तरी सुद्धा शेवटी कोणाला उमेदवारी द्यायची हा सर्वस्वी पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे," असं आमदार नितेश राणे म्हणाले.
हेही वाचा :