मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांना त्यांच्या जन्मदिनी जीवे मारण्याची धमकी मिळाली ( Death threat to Sharad Pawar ) होती. तसेच दिवाळीतही त्यांना अशा स्वरूपाच्या धमकीचे जवळपास १०० फोन आले होते. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी गुन्हा नोंदवत बिहारमधील नारायण सोनी याला अटक ( Those who threatened Sharad Pawar arrested ) केली आहे. आरोपी नारायण कुमार सोनी याला आज मुंबईतील गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी आरोपीची चौकशी करण्याकरिता पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत आरोपीला तीन दिवसांची 16 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. मात्र, आरोपीने पत्नी सोडून गेल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
शरद पवारांबद्दल आरोपीच्या मनात राग - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण सोनी हा मनोरुग्ण आहे. नारायण सोनी हा १० वर्ष पुण्यात राहिला. त्याच्यासोबत त्याची पत्नीही होती. मात्र दोघांचं बिनसल्याने दोघेही वेगळे झाले. पत्नीने नारायण सोनीला सोडून दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले. शरद पवारांनी पती-पत्नीच्या भांडणाप्रकरणात काहीही कारवाई केली नसल्याचा राग नारायण सोनीच्या मनात होता. त्यातूनच त्याने शरद पवारांना धमकी दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
नारायण सोनीला अटक - शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाच्या दूरध्वनीवर फोनवर ही धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. २ डिसेंबरला पवार यांचे सचिव सतीश राऊत यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहून नारायण सोनी नावाचा व्यक्ती वारंवार फोन करून त्रास देत असल्याची तक्रार केली होती. नारायण सोनीला आज कोर्टात हजर केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी IPC च्या कलम 294, 506 (2) अंतर्गत गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.