मुंबई - महाविकास आघाडीसरकार हे तीन पक्षाचे तीन चाकी रिक्षा असलेले सरकार आहे, अशी टीका वारंवार विरोधी पक्षाकडून केली जाते. त्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकार जरी तीन चाकांचे असले तरी त्याचे स्टेअरिंग माझ्याच हातात असल्याचे ठाकरे म्हणाले, शिवाय केंद्रात जे सरकार आहे, त्याला किती चाके आहेत, ते सरकार तर रेल्वेचं असल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनासाठी कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी राज्य आणि केंद्रातील विविध मुद्यांवर भाष्य केले.
शिवसेना कार्याध्यक्ष असलेले ठाकरे यांनी मुलाखतीच्या पहिल्याच भागात हे स्पष्ट केले आहे, हे ठाकरे सरकार म्हणजे माझ्या एकट्याचे नाही. हे आघाडीचे सरकार आहे, ज्या जनतेने आम्हाला निवडून दिले. सत्तेत स्वीकारले त्यांचे सरकार आहे. विरोधक जरी तीन चाकाचे सरकार म्हणून टीका करत असले तरी याचे स्टेअरिंग माझ्या हातात आहे. तसेच काँग्रेस राष्ट्रवादी सारखे दोन अनुभवी पक्ष माझ्या रिक्षात पाठीमागे बसले आहेत. त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय अनुभवाचा मला फायदाच होत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले
या मुलाखतीवेळी ठाकरे यांनी भाजपचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनबाबतही भाष्य केले. त्यांनी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्गच या मुलाखतीतून वळवण्याचा प्रयत्न केला आहे. जर हीच बुलेटट्रेन मुंबईतून नागपूरला जाणार असेल तर माझ्या विदर्भावर अन्याय झाला ही भावना कमी होईल. आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाप्रमाणे मला राज्यात या बुलेटट्रेनचा शुभारंभ करण्यास आनंद वाटेल असे स्पष्ट मत व्यक्त करत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बाबत विचार करण्याची भूमिका व्यक्त केली. हा प्रोजेक्ट महाराष्ट्र आणि जनतेच्या हिताचा आहे की नाही हे पडताळूनच यावर पुढील निर्णय घेऊ अन्यथा या प्रोजेक्टला ब्रेक लावण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.
बुलेट ट्रेनबाबात बोलताना ठाकरे पुढे म्हणाले, रिक्षा गरिबाच्या प्रवासाचे साधन आहे. गरीब रिक्षाचा पर्याय निवडतील बुलेट ट्रेनचा नाही. त्यामुळे मीही गरिबांच्या पाठिशी राहिन मी रिक्षाचाच विचार करेन,आणि जनतेला जर बुलेट ट्रेन नको असेल तर मी ती होऊ देणार नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच आमच्या सरकारला तीन चाकी रिक्षा म्हणून हिनावणारे आता ही रिक्षा एका दिशेने व्यवस्थित मार्गक्रमण करत असताना विरोधकांच्या पोटात का दुखतेय ? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी विरोधकांना केला.
महाविकास आघाडीसरकारचे भविष्य हे विरोधकांच्या हातात नाही. या सरकारचे स्टेअरिंग माझ्या हातात आहे. रिक्षा हे गरिबाच्या प्रवासाचे साधन आहे आणि या सत्तेच्या रिक्षात माझ्या मागे दोन अनुभवी पक्ष बसले आहेत. त्यामुळे मला कसली भीती नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच भाजपकडून सप्टेबर ऑक्टोबरमध्ये हे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला असता, वाट कशाला बघता तुम्ही माझे सरकार आताच पाडून दाखवा, काही लोकांना नवनिर्मिती मध्ये आनंद असतो तर काही लोकांना बांधलेलेल्या इमारती उद्ध्वस्त करण्यात आणि विरोधकांना जर हे महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आनंद मिळत असेल तर त्यांनी ते आताच पाडावे, मी इथेच बसलो असल्याचेही आव्हान ठाकरे यांनी विरोधकांना दिले.
तसेच महाविकास आघाडी सरकार लोकशाहीच्या मूलतत्वाला धरून नसल्याचे टीका विरोधकांनी केली होती. त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, की भाजपकडून मध्यप्रदेश कर्नाटक आणि राजस्थानमध्ये सरकार पाडण्यासाठी जे प्रयत्न केले गेले आणि अजून ही सुरू आहेत, मग त्याला लोकशाही म्हणायची का? असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकार तीन चाकी रिक्षा असल्याची टीका करत हे सरकार स्थीर राहणार नसल्याची शंका उपस्थित केली. मात्र,ठाकरे म्हणाले, मी त्यांच्या सोबत ज्या उद्देशाने गेलो होतो. मात्र, त्यांच्या उद्देशात पोकळपणा दिसून आला. ते मला नंतर कळाले म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचेही ठाकरे म्हणाले. तसेच एखादा तरी नेता दाखवा जो विरोधी पक्षातून गेल्यानंतर मोठ्यापदावर गेला आहे. पक्ष अशा लोकांचा फक्त वापर करते आणि फेकून देते.
कोरोनाच्या काळात मंदावलेल्या राज्याच्या आर्थिक धोरणाबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, राज्याेत आतापर्यंत उद्योगांसंदर्भात १६ हजार कोटी रुपयांच्या गुतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. पुढे आणखी हजार कोटींची गुतवणूक स्वतंत्रपणे होणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणचे उद्योग आपण सुरू केले आहेत. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे. त्याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाविकास सरकारच्या तिन्ही पक्षात कुरबुरू सुरू असल्याच्या वृत्ताचे हे त्यांनी खंडण केले आहे. सुरुवातीला काही बातम्या तशा प्रकारच्या आल्या होत्या मात्र, काँग्रेसच्या नेत्यांची माझ्याशी चर्चा झाली आहे. आमच्यामध्ये कसलेच मतभेद नाहीत. शिवाय ज्या प्रमाणे शरद पवार यांच्यासोबत बैठका घेतो. त्याच प्रमाणे कधीकधी सोनिया गांधी यांच्याशीही फोनवर बोलत असल्याचे ठाकरे म्हणाले. कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष भेटी कमी झाले होते. धनंजय मुडे, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड या मंत्र्य़ांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे प्रत्यक्ष भेटी धोक्याच्या होत्या,असेही ठाकरे म्हणाले.
चीन संदर्भात पंतप्रधान मोदी सोबत झालेल्या बैठकीत देशाचे कोणतेही एक धोरण ठरवण्याची मागणी केली असल्याचे ठाकरे म्हणाले. प्रत्येक राज्याचे धोरण वेगवेगळे नको किंवा.. आज चीनला विरोध करणार आणि उद्या तुम्ही चिनी पंतप्रधानांना घेऊन हिंदी चिनी भाई-भाई ही भूमिका घेणार असाल तर ते धोरण चूकीचे आहे. तसे होणार असेल तर मग आजच आम्ही आमच्या राज्यात आलेली चीनची गुतंवणूक का थांबवावी? असा सवालही केला. चीन प्रश्नी सर्वांना देशाभिमान आहेच. मात्र, देशाचे एकच धोरण असणे गरजेचे असल्याचे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.