नवी मुंबई - चार वर्षीय मुलाचा खून झाल्याची घटना नवी मुंबईतील घणसोली येथे (काल) शुक्रवारी घडली. मुलगा खेळत असतानाचं अचानक बेपत्ता झाल्याने शोधाशोध सुरू झाली. मुलाचा मृतदेह घरापासून जवळचं एका गोणीत आढळून आला. चार वर्षीय चिमुरड्याची हत्या झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
नवी मुंबईतील घणसोली गावातील बाळाराम वाडीत चिमुरडा ओमकार साठे (4) आपले आईवडील व दोन मोठ्या बहिणींच्या सोबत राहत होता. त्याचे वडील रंगकाम करायचे. ते कामानिमित्त घराबाहेर होते. शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास ओमकार घराच्या बाहेर खेळत होता. मात्र, बराच वेळ ओमकार घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी व परिसरातील लोकांनी त्याचा शोध घेतला. त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरापासून जवळच काही अंतरावर एक गोणी पडली होती. ती स्थानिक नागरिकांनी उघडून पाहिली असता त्यात ओमकार आढळून आला.
त्याला त्वरीत जवळपास असणाऱ्या रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ओमकारच्या चिखलात भरलेल्या पावलांचे ठसे हे पायऱ्यांवर दिसून आले. त्यामुळे त्याला कोणीतरी उचलून नेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच परिसरात दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर गर्दुल्ल्यांचा वावर पाहता त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह पालिका रुग्णालयात पाठविण्यात आला असून, याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.