मुंबई - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तिसऱ्यांदा लाॅकडाऊनची मुदतवाढ करण्यात आली. लाॅकडाऊनच्या काळात मुंबईतील सर्व विकासकामे ठप्प झाली आहेत. मात्र, आता मुंबईतील विकासकामे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) मेट्रो प्रकल्पांच्या कामांना आता वेग आला आहे. त्यानुसार मेट्रो-2 बी या डीएन नगर ते मंडाळे तसेच मेट्रो-7 या दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व दोन्ही मार्गांचे काम प्राधान्याने सुरू करण्यात आले आहे.

सामग्रीचे सॅनिटायझर करण्यात येत असून, सामग्री आता प्रत्यक्ष प्रकल्पस्थळावर दाखल झाली. दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व या मेट्रो-7 मार्गावर विकासकामे सुरू झाली आहेत. यासाठी या मार्गवरील पोईसर, मागाठाणे, दिंडोशी या स्थानकांवर प्रत्येकी चार सरकते जिने, तर आकुर्ली स्थानकात दोन लिफ्ट दाखल झाले आहेत. तसेच विविध प्रकल्प स्थळी काम करणाऱ्या कामगारांची एमएमआरडीएमार्फत विशेष काळजी घेतली जात आहे. कामगारांची डॉक्टरांमार्फत वैद्यकीय तपासणी करून त्यांना आवश्यक सर्व गोष्टींचा पुरवठा केला जात आहे. त्यांची राहण्याचीही सोय करण्यात आली असून, त्यांना स्वच्छतेचे धडेही दिले जात आहेत.
याशिवाय, डीएन नगर ते मंडाले दरम्यानच्या मेट्रो-2 बी मार्गिकेवर गर्डरच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे, तर वडाळा-घाटकोपर-ठाणे कासारवडवली मेट्रो-4 मार्गिकेवरही गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. तसेच, दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो-7 मार्गिकेच्या कामालाही वेग आला आहे. यासह या मार्गिकेवरील स्थानकांमध्ये बसवण्यात येणाऱ्या एक्सलेटरपैकी 12 एक्सलेटर नुकतेच आणण्यात आले असून, दोन लिफ्ट आणण्यात आल्या आहेत.