मुंबई : यंदा समाधानकारक पाऊस पडला नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ३४ टक्के इतकाच पाणीसाठी जमा आहे. ऐरवी जुलैमध्ये ८० ते ९० टक्के भरणारी ही धरणे अजूनही रितीच आहेत. हा पाणीसाठा पुढील वर्षांपर्यंत वापरावा लागणार असल्याने येत्या ५ ऑगस्टपासून मुंबईत २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
जून व जुलै महिन्यात मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त सुमारे ३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीसाठा जुलै २०१९ मध्ये ८५.६८ टक्के व जुलै २०१८ मध्ये ८३.३० टक्के होता. हीच परिस्थिती यापुढेही राहिल्यास पावसाळा संपल्यानंतरसुद्धा महापालिकेकडे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे, मुंबईचा पाणीपुरवठा ३१ जुलै २०२१ पर्यंत सुरळीपणे चालू ठेवण्यासाठी पाणीपुरवठ्यात ५ ऑगस्ट २०२० पासून २० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
सदर पाणीकपात बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जाणाऱ्या ठाणे, भिवंडी महानगरपालिका व इतर गावांनासुद्धा लागू राहील. तरी सर्व नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.