मुंबई - यावेळी प्रत्येक सण आणि समारंभावर कोरोनाचे सावट आहे. यामुळे नवीन वर्षाचे स्वागत साध्या पद्धतीने करण्याचे काही तरुणांनी ठरवले आहे. मुंबईतील काही मित्रांनी एकत्र येत नवीन वर्षाच्या पार्टीसाठी जमा केलेले पैसे हे गरजू नागरिकांच्या मदतीला दिले आहेत. 'हेल्पिंग हॅण्ड' या बॅनरखाली 30 पेक्षा जास्त तरुणांनी एकत्र येऊन, रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना विविध वस्तूंचे वाटप केले आहे.
गरजूंना खाद्यपदार्थ आणि ब्लँकेटचे केले वाटप -
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सरकारने नाईट कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे यंदा नवीन वर्षाचे स्वागत अत्यंत साध्या पद्धतीने होणार आहे. अनेक नागरिकांनी देखील नवीन वर्षाचे स्वागत साध्या पद्धतीने करण्याचे ठरवले आहे. मुंबईतील काही तरुणांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमा केलेले पैसे पार्टीसाठी खर्च न करता एका चांगल्या उपक्रमासाठी खर्च केले आहेत. रस्त्यावर राहणाऱ्या गरजूंना थंडीपासून वाचण्यासाठी ब्लॅंकेट आणि खाण्याच्या वस्तूंचे वाटप केले आहेत. आतापर्यंत या तरुणांनी 200 पेक्षा जास्त गरजूंना कपडे आणि विविध वस्तूंचे वाटप केले आहे.
तीन वर्षांपासून करत आहेत गरजूंना मदत -
गेल्या तीन वर्षापासून आम्ही सर्व मित्र हेल्पिंग हॅन्ड या बॅनरखाली एकत्र येऊन गरजूंसाठी अनेक उपक्रम राबवतो. यावेळी कोरोना काळ असल्यामुळे आम्ही पार्टीसाठी जमा केलेले पैसे चांगल्या उपक्रमासाठी वापरले आहेत. ज्या गरजूंना दोन वेळचे अन्न मिळत नाही, थंडीपासून संरक्षण करण्यासाठी ब्लॅंकेट नाही, अशांना आम्ही धान्य आणि ब्लॅंकेट वाटले आहेत. आम्ही नागरिकांनीदेखील आव्हान करतो, यंदाच्या नवीन वर्षाचे स्वागत साध्या पद्धतीने करावे आणि आणि जे पैसे उरतील त्यातून गरिबांना मदत करावी. तीन जानेवारीला देखील आम्ही गरजू नागरिकांना पुन्हा मदत करणार आहोत, अशी माहिती निहार कुडासकर या तरुणाने दिली.