मुंबई : मुंबईला ३८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत आहे. त्यामधील ७५ टक्के पाणी भांडूप संकुल येथील जलशुध्दीकरण केंद्रामार्फत नागरिकांना मिळते. भांडुप संकुल ते ठाणे दरम्यान ५५०० मिलिमीटर व्यास असलेला १५ किलोमीटर बोगदा आहे. या बोगद्यावर एका विकासकाकडून ठाणे येथे बोअरवेलचे खोदकाम सुरू असताना गळती झाली. या दुरुस्तीसाठी जलबोगदा ३१ मार्चपासून बंद करण्यात आले होते. त्यामुळे मुंबईत ३० दिवसांसाठी १५ टक्के कपात लागू करण्यात आली होती.
जलबोगदा जमिनीपासून १०० ते १२५ मीटर खोल : हा जलबोगदा १०० ते १२५ मीटर जमिनीखाली आहे. १२५ मीटर खोल व ४.२ किलोमीटर लांब असलेल्या बोगद्यात शिरुन दुरुस्ती करणे, जल अभियंता विभाग आणि पाणीपुरवठा प्रकल्प विभागासमोर आव्हान होते. जल विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी अथक प्रयत्न करून १८ एप्रिलला दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. ३० दिवसात जे काम होणार होते ते काम पालिका कर्मचाऱ्यांनी १८ दिवसात पूर्ण केले आहे.
'असे' पूर्ण झाले काम : जलबोगद्याच्या दुरुस्तीचे काम ३१ मार्च २०२३ रोजी सुरु झाले. दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ आदी सर्व गोष्टी सज्ज ठेवण्यात आल्या. भांडुप व कापूरबावडी येथील झडपेचे पोलादी डोम कापून क्रेनच्या सहाय्याने हानी पोहोचलेल्या ठिकाणी पॅकर टाकून ग्राऊटिंगने पाणी गळती बंद करण्यात आली. वागळे इस्टेट येथे १०० मीटर खोल बोअर वेलमध्ये विशिष्ट असे सिमेंट व वाळू यांचे मिश्रण टाकून ते बंद करण्यात आले.
येत्या ३ ते ४ दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत : बोगद्यातील पाणीपुरवठा करणारी यंत्रणा बाहेर काढून कापुरबावडी व भांडूप संकुल येथील पोलादी डोम वेल्डींगच्या सहाय्याने पुन्हा बंद करण्यात आले. जलबोगद्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारपासून झडपांच्या वापरला सुरूवात करण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यावर हा जल बोगदा पाण्याने भरून घेण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीपुरवठा रविवार २३ एप्रिलपासून पूर्ववत होईल, असे जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले.