मुंबई : यंदा नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडलेल्या 156 तळीरामांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर रंगपंचमीनिमित्त सणाला गालबोट लागू नये म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी मद्यपानकरून गाडी चालवणाऱ्या एकूण 73 वाहनचालकांवर कारवाई केली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
तळीरामांवर पोलिसांची नजर : मुंबईत यंदा होळी आणि रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मात्र या सणाला गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलीसांनी कंबर कसली होती. तर मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने देखील रस्त्यावर उतरून कारवाई केली होती. मुंबईत वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन वाहने चालू नये असे देखील आवाहन केले होते. मात्र, तरीदेखील मुंबईत मोठ्या प्रमाणावर मद्यपान करून वाहन चालवताना वाहन चालक आढळून आले. मुंबई वाहतूक पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईत तब्बल 65 दुचाकी चालक आणि 8 चारचाकी वाहन चालक तळीरामांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाई केली. अशा प्रकारे आज रंगपंचमी दिवशी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने कारवाईचा बगडा उचलला होता.
अनेकांवर कारवाई : मुंबई वाहतूक पोलिसांनी आज मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या सुमारे 65 दुचाकी आणि 8 चारचाकी वाहनचालकांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर मोटार वाहन चालकांवर ड्रंक अँड ड्राईव्ह कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन : मद्यपान करून वाहन चालवणे, बेदरकारपणे वाहन चालवणे आणि त्याच प्रमाणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणे हे टाळण्यासाठी रंगपंचमीच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी ठेवण्यात आली होती. मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, सीट बेल्ट लावून चारचाकी चालवणे आणि हेल्मेट घालून दुचाकी चालवणे असे आवाहन मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून वारंवार सांगण्यात येते. त्यासाठी जनजागृती पर कार्यक्रम देखील घेतले जातात. मात्र त्याकडे अनेक वाहन चालक काना डोळाकरून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करतात. त्यांच्याबरोबर अपघात कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस डोळ्यात तेल घालून कारवाई करत असतात. सणासुदीच्या दिवशी ही कारवाई मोठ्या प्रमाणावर केली जाते.
हेही वाचा :Rangpanchami : मुख्यमंत्र्यांनी नातवासोबत केली रंगपंचमी साजरी