मुंबई - कर्तव्य बजावणाऱ्या कोणत्याही पोलिसाचा मतदानाचा हक्क हिरावला जाऊ नये. यासाठी पोस्टल बॅलेटच्या मदतीने निवडणुकीनंतर पोलीस आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मुंबई पोलिसांना मतदानाचा हक्क बजावता यावा. यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलात ५० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. मुंबईत २९ एप्रिलला मतदान होणार आहे. यावेळी सगळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असतील. त्यामुळे ज्या पोलिसांना २९ तारखेला मतदान करता येणार नाही त्यांना पोस्टल बॅलेट दिले जाणार आहेत.
मुंबईत लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर निवडणूक आयोग ठरवेल त्या दिवशी आणि त्या ठिकाणी जाऊन हे पोलीस कर्मचारी आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील. आत्तापर्यंत १६ हजार पोलिसांनी पोस्टल बॅलेटसाठी अर्ज केल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते मंजुनाथ सिंघे यांनी दिली आहे.