मुंबई : कोरोना विषाणूचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाययोजना प्रशासकीय स्तरावर केल्या जात आहेत. राज्यात 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवला गेला आहे. लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 3 हजार 571 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
20 मार्च ते 2 जुलै दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 12 हजार 589 प्रकरणात तब्बल 26 हजार 1 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्या 3 हजार 147 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 8 हजार 17 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. तसेच, 14 हजार 837 आरोपींना जामीनवर पोलिसांनी सोडून दिलेले आहे.
लॉकडॉऊन काळामध्ये कलम 188 नुसार मुंबईतील दक्षिण मुंबईत 1 हजार 246 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, मध्य मुंबईत 2 हजार 338 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पूर्व मुंबईमध्ये तब्बल 2 हजार 264 गुन्हे, पश्चिम मुंबईत 2 हजार 207 तर, उत्तर मुंबईत 4 हजार 534 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे गुन्हे कोरोनाबाधित रुग्णांच्या संदर्भात, विनापरवानगी दुकान किंवा हॉटेल उघडी ठेवण्यासंदर्भात, पानटपरी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे व अवैध वाहतूकप्रकरणी नोंदविण्यात आले आहेत.