मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सार्वजनिक ठिकाणी शांतता, सुरक्षितता आबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत 11 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत शस्त्र बंदीचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. यादरम्यान शारीरिक हानी पोहचविणारी हत्यारे, चाकू, तलवारी, भाले, दंडूके, बिना परवाना बंदुका, बॅटन आदी शस्त्रं तुम्ही स्वत: जवळ बाळगू शकत नाही, असा मुंबई पोलिसांनी आदेश काढला आहे. वरीलपैकी कोणतेही शस्त्र आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं देखील मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.
टिकात्मक गाण्यावर बंदी : जानेवारी महिन्यात म्हणजे 20 जानेवारीला मराठा आरक्षण आंदोलनाची हाक मनोज जरांगे-पाटील यांनी दिली आहे. तर दुसऱ्या दिवशी 21 जानेवारीला टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी जगभरातून खेळाडू मुंबईत दाखल होणार आहेत. यामुळं सार्वजिनिक ठिकाणी शस्त्र न बाळगण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. तसंच 11 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत स्फोटके वाहून नेणे किंवा जवळ बाळगणे, दगड गोळा करणे यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. याव्यतिरिक्त आकृती, व्यक्ती, मृतदेह किंवा पुतळे यांचे प्रदर्शन करता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी टिकात्मक गाणी आणि संगीत वाजवणे यावर सुद्धा मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे.
कोणत्या कारणासाठी निर्णय? सध्या राज्यात मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे-पाटील यांनी रान पेटवलं आहे. याच धरतीवर मनोज जरांगे-पाटील हे मुंबईत 20 जानेवारीपासून आंदोलन करत उपोषणाला बसणार आहेत. यामुळं राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज दाखल होण्याची शक्यता आहे. साधारण तीन कोटी मराठा बांधव मुंबईत येतील, असं मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे. जर तीन कोटी मराठा समाज मुंबईत आला तर मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात पोलिसांवर मोठा ताण येण्याची शक्यता असून, याला आवर घालण्याचे मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. परिणामी कायदा-सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, सुरक्षितता, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून मुंबई पोलिसांनी हा मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे, असं बोललं जात आहे.
हेही वाचा :