मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री आणि एका महिला नेत्याच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर विवादित टिप्पणी करणाऱ्या दिल्लीतील अॅडव्होकेट विभोर आनंद यास मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने अटक केल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर अॅडव्होकेट विभोर आनंदकडून सुशांतसिंह राजपूत प्रकरणी वेगवेगळे आरोप केले जात होते. या दरम्यान यूट्यूबच्या एका लाईव्ह सेशनच्या वेळेस विभोर आनंद याने आरोप केला होता की, 7 जूनला बालाजी टेलीफिल्म्स निर्माता एकता कपूर हिने तिच्या जुहू येथील फार्महाऊसवर एक पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये अभिनेता अरबाज खान, शोविक चक्रवर्ती, दिशा सालियन यांच्यासह महाराष्ट्रातील एका मंत्राचा समावेश असल्याचा आरोप केला होता.
अभिनेता अरबाज खान याच्याकडून न्यायालयामध्ये या संदर्भात मानहानीचा दावा दाखल करण्यात आलेला होता. याबरोबरच सुशांतसिंह राजपूत किंवा दिशा सालियन मृत्यूप्रकरणी कुठल्याही समाजमाध्यमांवर माझ्याबद्दल टीका टिप्पणी किंवा कुठलीही माहिती प्रसारित केली जाऊ नये, अशी मागणीसुद्धा अरबाज खान यांनी केली होती. या संदर्भात अॅडव्होकेट विभोर आनंद यास अशा प्रकारचे कृत्य न करण्याची सूचनाही सीटी सिव्हिल कोर्टाने केली होती.