मुंबई-लॉकडाऊन काळामध्ये प्रवाशांची अवैध वाहतूक प्रकरणी मुंबई पोलिसांच्या रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्याने मोठी कारवाई केली आहे. 5 मे रोजी पहाटेच्या वेळेस शिवडी परिसरामध्ये नाका-बंदी दरम्यान एक संशयित टेम्पो पकडण्यात आलेला होता. पोलिसांनी या टेम्पोची झडती घेतली असता त्यामधून तब्बल 43 प्रवाशांची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याचे समोर आल्यानंतर कारवाई केली.
पोलिसांनी या संदर्भात टेम्पोचा मालक मोहम्मद जलील याच्याविरोधात गुन्हा नोंदविला असून टेम्पो चालक सहादत अली मोहम्मद याकूब याला अटक करण्यात आलेली आहे. चालकावर कलम 188 , 269 , 34 वाहन कायदा 1988 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, टेम्पोचा मालक सध्या फरार झालेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
परप्रांतीय प्रवाशांना उत्तर प्रदेश येथे नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले आहे. सध्या मुंबईत अडकलेल्या परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र,उत्तर प्रदेश सरकारकडून या कामगारांना पुन्हा राज्यात घेण्यासाठी अडचणी येत असल्या कारणामुळे या प्रवाशांनी छुप्या पद्धतीने मुंबईतून उत्तर प्रदेश ला जाण्याचा प्रयत्न केला होता.
टेम्पोमधील 43 प्रवाशांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 68 अंतर्गत ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. पोलीस या संदर्भात अधिक तपास करीत आहेत.